

पुणे: पीएमपी प्रशासनाने ’आपली पीएमपीएमएल’ ॲपच्या वापरकर्त्यांची संख्या वाढवण्यासाठी नवा फंडा राबविण्याचे नियोजन केले आहे. ॲपचे वापरकर्ते वाढवून त्याच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुलभ व वेगवान सेवा देण्यासाठी आता बसमधील प्रत्येक सीटच्या मागे क्यूआर कोड लावला जाणार आहे.
हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रवाशांना पीएमपीचे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. पीएमपीचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
पीएमपी प्रशासनाने डिजिटल प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी कंबर कसली आहे. सध्या अनेक प्रवाशांना ॲपबद्दल माहिती असूनही ते डाऊनलोड करण्यास टाळाटाळ करतात. ही अडचण दूर करण्यासाठी बसमधील प्रत्येक सीटच्या मागे एक विशिष्ट क्यूआर कोड असेल. प्रवासादरम्यान आपल्या जागेवर बसूनच प्रवासी तो कोड स्कॅन करू शकतील. स्कॅन करताच थेट पीएमपीएमएल ॲप डाऊनलोड करण्याची लिंक उपलब्ध होईल.
या मोहिमेद्वारे जास्तीत जास्त ग््रााहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रशासनाचा मानस आहे. ॲपमुळे प्रवाशांना बस सध्या कुठे आहे आणि किती वेळात येईल, याची अचूक माहिती मिळणार आहे. प्रवाशांना रांगेत उभे न राहता मोबाईलवरून तिकीट किंवा पास काढण्याची सुविधा मिळेल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध बस मार्ग क्रमांक शोधणे सोपे होणार आहे.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि हायटेक व्हावा, हा आमचा उद्देश आहे. बसमध्ये बसल्या जागीच प्रवाशांना ॲप उपलब्ध करून दिल्याने वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होईल. परिणामी, प्रवाशांना अधिक सुलभ, वेगवान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सेवा पुरवता येईल, असा विश्वास आहे.
महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल