

निनाद देशमुख
पुणे: आठ दिशांना जोडणारे रॅम्प, प्रशस्त सेवा रस्ते आणि बहुस्तरीय इंटरचेंज उभारल्यामुळे चांदणी चौकाचा चेहरा-मोहरा बदलला. या प्रकल्पावर तब्बल ८६५ कोटी रुपये खर्च झाले, तरीही तेथे वाहतूक कोडी होतेच आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिम प्रवेशद्वारावरील वाहतूक समस्येचा कायमस्वरूपी निकाल लागलेला नाही.
एखादे वाहन बंद पडले, अपघात झाला अथवा सुटीच्या दिवशी वाहनांची संख्या अचानक वाढली की नवले पूल, वारजे, चांदणी चौक आणि पुढे पाषाणच्या दिशेपर्यंत वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे दै.'पुढारी'ने केलेल्या पाहणीत आढळले. येथील पूल उभारणीसाठी कोट्यवधी खर्चून देखील येथील वाहतूक कोंडीची समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेली नाही, ही वस्तुस्थिती समोर आली.
तत्कालीन मुख्यमंत्री कोंडीत अडकले अन्...
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे-बंगळुरू मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकले आणि चांदणी चौकीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा सरकारी झाला. येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काही दिवसांतच मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. खासदार मुरलीधर मोहोळ आणि भाजपच्या नेत्यांनी देखील या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी येथे पाहणीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तयारी सुरू केली.
केंद्राने घेतला पुढाकार....
केंद्र सरकारने १२ ऑगस्ट २०२३ रोजी चांदणी चौकातील एकात्मिक पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन केले.
सुमारे ८६५ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पात २.२ किलोमीटरचा इंटरचेंज, आठ दिशांना जाण्यासाठी आठ रॅम्प आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूंना अंतर्गत व बाह्य सेवा रस्ते विकसित करण्यात आले.
संपूर्ण प्रकल्पातील रस्त्यांची एकत्रित लांबी सुमारे १६.९८ किलोमीटर आहे. हा पूल झाल्यामुळे येथील वाहतूक सुरळीत झाली असली तरी नेमकी प्राईम टाईमला ऑफिसच्या वेळीच या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
या मार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास या मार्गावरील वाहतूकही मोठ्या प्रमाणात संथ होते. त्यामुळे पूल बांधूनही या मार्गावरील वाहतूक कोंडी आणि तिचा वेग या समस्या कायम आहेत.
चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा विचार करताना केवळ पुलापुरते नियोजन करून चालणार नाही. वेगवेगळ्या दिशांनी येणारी वाहने या परिसरात एकत्र येतात. पुलावरून वाहने पुढे गेल्यानंतर ती ज्या जोडरस्त्यांवर उतरतात, त्या रस्त्यांची क्षमता पुरेशी नसेल, तर पुढे पुन्हा कोंडी होते. त्यामुळे कितीही पूल बांधले, तरी जोड रस्त्यांची क्षमता आणि पुढील वाहतुकीचे नियोजन यांचा एकत्रित विचार केल्याशिवाय प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही.
चंद्रकांत कदम, गटनेते, काँग्रेस