PMC Ward Structure Hearing: प्रभागरचनेच्या हरकतींवरील सुनावणीसाठी पालिका सज्ज; वेळापत्रक जाहीर

11-12 सप्टेंबरला बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार सुनावणी
PMC Ward Structure Hearing
प्रभागरचनेच्या हरकतींवरील सुनावणीसाठी पालिका सज्ज; वेळापत्रक जाहीरPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर गुरुवार, 11 सप्टेंबर आणि शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिर येथे सुनावणी पार पडणार आहे. हरकती दाखल करणार्‍यांनी या सुनावणीला उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. कोर्टाच्या आदेशानंतर या निवडणूक प्रक्रियेला गती आली. गेल्या महिन्यात निवडणूक विभागाच्या आदेशानुसार प्रभागरचना जाहीर करण्यात आली. मात्र, ही प्रभागरचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. (Latest Pune News)

PMC Ward Structure Hearing
Pune Politics: बाजार समितीतील 200 कोटींच्या भ्रष्टाचाराला अजित पवारांचा वरदहस्त; रोहित पवार यांचा घणाघात

नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांमुळे प्रभागरचनेत मोठे बदल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. या रचनेविरोधात नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे 5 हजार 922 हरकती नोंदल्या गेल्या, त्यापैकी दोन दिवशी सर्वाधिक हरकती दाखल झाल्या, तर शेवटच्या दिवशी तब्बल साडेतीन हजार हरकती दाखल झाल्या.

या हरकतींवर सुनावणी करून अंतिम निर्णय घेण्यासाठी व्ही. राधा यांची नगरविकास विभागाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्या प्रत्येक हरकत व सूचनेवर सुनावणी घेऊन याबाबतचा अहवाल हा राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे. प्रभागरचनेविरोधातील ही सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.

11 सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक 1 ते 29, तर 12 सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक 30 ते 41 या प्रभागांवरील हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणीसाठी हरकती दाखल केलेल्या नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे. महापालिकेने प्रभागनिहाय वेळापत्रक जाहीर केले असून, याबाबतचे पत्र प्रत्येक अर्जदाराला पाठविण्यात आले आहे.

41 प्रभागांतून निवडून जाणार 165 उमेदवार

पुणे महापालिकेत एकूण 165 नगरसेवक निवडले जाणार असून, 41 प्रभाग आहेत. त्यापैकी 40 प्रभाग चारसदस्यीय आहेत, तर आंबेगाव-कात्रज (प्रभाग क्रमांक 38) हा पाचसदस्यीय ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला पालिकेत 34 गावे समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने उरुळी देवाची व फुरसुंगी या गावांना वगळले. या बदलांमुळे नव्याने प्रभागरचना करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व माजी नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काही पक्षांकडून भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांना पोषक रचना झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

PMC Ward Structure Hearing
Clerk Recruitment: कृषी विभागांतर्गत लिपिक भरतीत 326 लिपिक ठरले पात्र; 57 उमेदवारांना नियुक्ती आदेश जारी

प्रभागनिहाय सुनावणी अशी होणार

1) 11 सप्टेंबर 2025 (गुरुवार)

प्रभाग 1 ते 6 - सकाळी 10 ते सकाळी 11.30 वा.

प्रभाग 7 ते 14 - सकाळी 11 ते दुपारी 1.30 वा.

प्रभाग 15 ते 21 - दुपारी 2.30 ते सायं. 4 वा.

प्रभाग 22 ते 29 - सायं. 4 ते सायं. 6 वा.

2) 12 सप्टेंबर 2025 (शुक्रवार)

प्रभाग 30 ते 34 - सकाळी 10 ते सकाळी 11.30 वा.

प्रभाग 35 ते 37 - सकाळी 11 ते दुपारी 1 वा.

प्रभाग 38 ते 41 - दुपारी 2.30 ते सायं. 4 वा.

सामाईक हरकती राखीव - सायं. 4 ते सायं 5 वा.

प्रभागरचनेबाबत दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी व्ही. राधा यांच्या अध्यक्षते खाली बालगंधर्व रंगमंदिर येथे 11 आणि 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. सुनावणीसाठी संबंधितांना वेळापत्रक व पत्र पाठविण्यात आले आहे.

- प्रसाद काटकर, उपायुक्त (निवडणूक विभाग)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news