

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती गुंड आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकली आहे. बेकायदा भाडे वसुलीचा जी 55 गैरव्यवहार, 4 हजार लोकांना अनधिकृत परवाना, बेकायदा जागा भाड्याने देणे, रोजंदारी सेवकांच्या कायम नियुक्तीत संचालक मंडळ आणि अधिकार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरदहस्ताने येथे तब्बल 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी केला आहे. (Latest Pune News)
गुलटेकडी मार्केट यार्डमधील निसर्ग मंगल कार्यालयात बाजार समितीविषयक आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. त्यावेळी प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे उपस्थित होते.
पवार म्हणाले, येथील भ्रष्टाचाराची चर्चा विधीमंडळातही झाली आहे. मात्र, बाजार समितीतील संचालक मंडळ मंत्र्याना पाकिट पोहोचवत आहे. त्यामुळे मंत्र्याची चुप्पी असल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला. या बाबत 15 दिवसांत सरकारकडून कारवाई न झाल्यास शेतकरी आंदोलन उभारण्याचा इशारा पवार यांनी यावेळी दिला.
‘बीसीसीआयची निवडणूक लढण्याचा विचार नाही’
भारतीय नियामक मंडळाची (बीसीसीआय) अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा सध्या कोणताही विचार मनात नाही. पण ती आता योग्य वेळ नाही. तेथे जायचे असेल तर बीसीसीआयच्या निवडणुकीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे एमओएच्या निवडणुकीत आता लक्ष घालणार नसल्याचे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले.
बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न 106 कोटी रुपये असताना 200 कोटी रुपयांचा भ—ष्टाचाराचा आरोप केला आहे. बाजार समितीमध्ये कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. पणन विभागाने चौकशी समिती नेमली आहे. यातून सत्य पुढे येईल. बाजार आवारात कोणताही चुकीची गोष्ट होत नाही. पवार यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. याबाबत त्यांच्याशी समोरासमोर चर्चेस तयार आहे.
- प्रकाश जगताप, सभापती, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती