

पुणे: कृषी आयुक्तालयांतर्गत लिपिक पदाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेतलेल्या परीक्षेद्वारे 326 जणांची निवड झालेली आहे. त्यापैकी 57 लिपिकांना नियुक्त्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. तर 15 सप्टेंबर रोजी आणखी 99 लिपिकांना नियुक्तीपत्रे संबंधित जिल्हाधिकार्यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
एमपीएससीमार्फत 379 लिपिकांच्या पदभरतीसाठी जाहिरात काढण्यात आली. त्यातून त्यांनी 365 उमेदवारांची शिफारस केली. त्यातून कागदपत्र पडताळणीसाठी प्रत्यक्षात 330 उमेदवार उपस्थित राहिले. तर प्रत्यक्षात नियुक्तीसाठी 326 उमेदवार पात्र झाले. त्यानुसार प्रथम टप्प्यात 57 आदेश जारी झाले. (Latest Pune News)
15 सप्टेंबरला संंबंधित जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत अनुकंपासह विविध विभागांमधील उमेदवारांना नियुक्तीपत्रे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये कृषी विभागातील दुसर्या टप्प्यातील 99 उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित होतील. म्हणजे एकूण संख्या 156 होईल. तर उर्वरित 170 उमेदवारांच्या कागदपत्रे-प्रमाणपत्रांच्या पडताळणीचे काम सध्या सुरू असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
रिक्त लिपिक नियुक्त्यांमुळे कामांना येणार गती
राज्यात कृषी आयुक्तालयांतर्गत मंजूर लिपिक पदांची संख्या 2 हजार 56 इतकी आहे. सध्या कार्यरत 917 लिपिक असून 1139 लिपिकांची पदे रिक्त आहेत. त्यामध्ये आता भरतीमधील निवड झालेल्या एकूण 326 लिपिकांनी पदभार स्वीकारणे अपेक्षित आहे. त्यानंतर लिपिकांच्या रिक्त पदांची संख्या 813 पर्यंत खाली येतील. मात्र, लिपिकांच्या नवीन पदभरतीमुळे कृषी विभागाच्या प्रशासकीय कामांना गती येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.