पुणे: आगामी महापालिका निवडणुकीसाठीच्या चारसदस्यीय प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा महापालिका प्रशासनाकडून सोमवारी राज्य शासनाला सादर करण्यात आला. आता नगरविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या मंजुरीनंतर येत्या दि. 22 ऑगस्टला हा आराखडा जाहीर होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश मे महिन्यात दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने महापालिकांसाठी पुन्हा चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेत प्रभागरचना करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, दि. 5 ऑगस्टपर्यंत प्रारूप प्रभागरचना निश्चित करून त्याचा आराखडा सादर करण्याची मुदत होती. (Latest Pune News)
ही मुदत आज मं?ळवारी संपणार होती. मात्र, त्यापूर्वीच शासनाकडून आलेल्या सूचनांनुसार सोमवारीच हा आराखडा सादर करून सूचना आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक कार्यालयाने रविवारी मध्यरात्रीपर्यंत प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी आज मुंबईत आराखडा सादर केला.
आता नगरविकास विभाग दि. 6 ते 11 ऑगस्टदरम्यान प्रभागरचनेची तपासणी करणार असून, या विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगास आराखडा सादर होईल. आयोग 21 ऑगस्टपर्यंत प्रभागरचनेची तपासणी करणार आहे. त्यानंतर दि. 22 ते 28 ऑगस्टदरम्यान महापालिकेकडून हा प्रारूप प्रभागरचना आराखडा जाहीर करून त्यावर हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे दि. 21 ऑगस्टनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
आता ’नगरविकास’मध्ये संधी मिळणार का?
महापालिका प्रशासनाने केलेल्या प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा आहे. रचना जाहीर होण्याआधीच नक्की कसे प्रभाग झाले आहेत, याचीही जोरदार चर्चा असून, सोशल माध्यमात काही ठिकाणी प्रभागांचे नकाशे व्हायरल झाले आहेत. मात्र, हे नकाशे खरे आहेत, हे प्रत्यक्षात प्रशासनाची रचना जाहीर झाल्यावरच स्पष्ट होऊ शकणार आहे.
दरम्यान, या रचनेत महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांना भाजपने विश्वासात न घेतल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेकडे असलेल्या ’नगरविकास खात्या’कडे रचनेचा आराखडा गेला असल्याने त्या ठिकाणी तरी शिवसेना व राष्ट्रवादीला सोयीची रचना करण्याची संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रभागरचनेवर 2017 च्या रचनेची छाप
महापालिका प्रशासनाने केलेली प्रारूप प्रभागरचना 2017 ची प्रभागरचना प्रमाण मानून त्यानुसारच केली असल्याचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले. ते म्हणाले, ’पालिकेत 32 गावांचा समावेश झाला असून, मतदारांची संख्याही 4 लाखांनी वाढली आहे. प्रभागरचनेत त्याचा योग्य पद्धतीने ताळमेळ घातला आहे. यामध्ये काही प्रभाग मोठे झाले आहेत, तर काही ठिकाणी प्रभाग छोटेही झाले आहेत. मात्र, सर्व ठिकाणी नियमांचे पालन झाले आहे.