

पुणे: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार्या या उत्सवादरम्यान गणेश मंडळांसह नागरिकांसाठी महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार समाविष्ट गावांतील गणेश मंडळांना यावर्षी महापालिकेची रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, सूचनांचे व अटी-शर्तींचे पालन करण्याचे आवाहन सर्व गणेश मंडळांना व संस्थांना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी केले आहे.
2022 पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी 2019 मध्ये देण्यात आलेल्या उत्सव मंडप, स्वागत कमानी व रनिंग मंडप इत्यादीच्या परवानगी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अशा परवानाधारकांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. या परवानग्यांना पुणे मनपामार्फत परवाना शुल्क आकारले जाणार नाही, असेदेखील आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. (Latest Pune News)
पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील गणेश मंडळांना स्थानिक पोलिस विभाग, वाहतूक पोलिस विभाग तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालय यांच्यामार्फत सन 2019 सालची परवानगी घेण्यासाठी वापरण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून रीतसर नव्याने या वर्षांकरिता सर्व परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. यासाठी त्यांच्याकडून देखील कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही, असेदेखील महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पुणे शहरात ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करावयाचा असेल किंवा पूर्वीच्या 2019 मधील परवानगीची जागा प्रकल्पबाधित झाल्याने किंवा इतर कारणास्तव बदल करणे आवश्यक असल्यास नवीन जागेवरील सर्व परवानग्या 2019 सालच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून नव्याने घ्याव्या लागतील, असे महापालिकेने नमूद केले आहे.
या दोन मुद्द्यांनुसार ज्या मंडळांना नव्याने उत्सव मंडप, स्वागत कमानी व रनिंग मंडप इत्यादीच्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत, अशा मंडळांसाठी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये पुणे महापालिका व पुणे शहर पोलिस विभाग यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे ‘एक खिडकी योजना’ राबवून आवश्यक सर्व परवानग्या येथे मिळणार आहेत.
‘या ’ नियमांचे करावे लागेल पालन
मंडपाची उंची 40 फुटांपेक्षा जास्त नसावी. 40 फुटांपेक्षा जास्तीचा मंडप उभारायाचा असल्यास त्याकामी मंडळांनी अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टेबेलिटी सर्टिफिकेट जोडणे गरजेचे राहील.
मंडप व स्वागत कमानी उभारताना आपत्कालीन गाड्या उदा. अग्रिशमन, रुग्णवाहिका तसेच प्रवासी बस आदी रहदारीकरिता लगतचे रस्ते मोकळे ठेवणे तसेच कमानींची उंची रस्त्याच्या पृष्ठभागापासून 18 फुटांपेक्षा जास्त राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार स्वयंसेवक किंवा सुरक्षारक्षक नेमावेत.
स्थापना करण्यात येणार्या गणेशमूर्ती प्राधान्याने पर्यावरणपूरक शाडू मातीच्याच वापराव्यात. संस्था, संघटना, मंडळे अथवा वैयक्तिक नागरिक यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांना योगदान देऊन यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या प्रदूषण नियंत्रणविषयक कायद्याची आणि मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी.
यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन, स्थानिक प्रशासन व पोलिस विभाग यांच्यामार्फत वेळोवेळी कळविल्यानुसार सर्व नियम व अटी-शर्तींचे पालन करणे सर्व गणेश मंडळांना बंधनकारक करण्यात येईल.
उत्सव संपल्यानंतर संबंधितांनी 3 दिवसांचे आत स्वखर्चाने सदरचे मंडप, स्टेज, रनिंग मंडप, कमान तसेच रस्त्यावरील देखावे, विटांमधील बांधकामे, देखाव्यातील मूर्ती व अन्य साहित्य रस्त्यांवरून ताबडतोब हटवून घेणे तसेच घेतलेले रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रीटमध्ये बुजवून घेणे बंधनकारक राहील.
ध्वनिप्रदूषणाबाबत शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करावे, गणेशोत्सव कालावधीत याकामी नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची संपूर्ण काळजी घ्यावी.
परवाना दिलेल्या जागेची पुणे महापालिकेस जरुरी भासल्यास अथवा त्या जागेबाबतचा वाद-विवाद निर्माण झाल्यास देण्यात आलेला अधिकृत मंडप, कमान परवाना उत्सव सुरू होण्याच्या पूर्वी रद्द करण्याचा महापालिकेस हक्क राहील.
सर्व सूचनांचे सर्व मंडळांनी पालन करणे बंधनकारक राहील तसेच सर्व परवान्यांच्या प्रती मंडप/कमानीच्या दर्शनी भागात लावाव्यात.
स्थानिकांना अडथळा होणार नाही, ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही, याची मंडळांनी दक्षता घ्यावी.