

यवत: यवतची बाजारपेठ पाचव्या दिवशी उघडली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शुक्रवारी यवत गावात धार्मिक धार्मिक तेढ निर्माण होऊन झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीमुळे यवत गावाची बाजारपेठ सलग चार दिवस बंद होती.
सोमवारी (दिं. ४) रात्री जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी (दि. ५) सकाळी ६ ते ११ या वेळेत संचारबंदी शिथिल करण्याचे आदेश दिल्यानंतर यवत गावातील बाजारपेठ काही अंशी सुरू झाल्याचे चित्र दिसत होते. बाजारपेठेतील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली नसली तरी काही दुकानदारांनी मात्र आपापली दुकाने सुरू केले आहेत.
शुक्रवारी झालेल्या दंगल सदृश्य परिस्थितीमुळे यवत गावातील व्यापारी देखील पूर्णपणे भयभीत झाले आहेत. मंगळवारी अवघ्या पाच तासासाठीच संचारबंदी शिथिल करण्यात आल्याने दुकाने उघडावीत की नको या मनस्थितीत व्यापारी वर्ग असल्याचे पाहायला मिळत आहे.