Vasant More
मुंबई : शिवसेना नेते वसंत मोरे यांचा नवले पुलावर फेसबुक लाईव्ह करत असताना मोठा अपघात होता होता टळला. भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो त्यांच्या जवळून गेला. वेळीच सर्वजण रस्त्याच्या कडेला धावल्याने थोडक्यात बचावले.
वसंतर मोरे नवले पुलावर सतत होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या विषयावर फेसबुक लाईव्ह करत होते. याच दरम्यान, त्यांच्या विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने टेम्पो थेट मोरे उभे असलेल्या दिशेने आला. वसंत मोरे, त्यांचे मित्र मच्छिंद्र खोमणे जे कॅमेरा धरून उभे होते आणि नितीन जगताप हे तिघेही रस्त्याच्या कुठल्याही लेनमध्ये नसून, तिन्ही लेनच्या पलीकडच्या बाजूला उभे होते. तरीही तो टेम्पो अतिशय वेगात येत होता. ज्या ठिकाणी ३० ते ४० चा स्पीड ठेवणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी तो टेम्पो किमान १०० च्या स्पीडने येत होता.
वेळीच मोरे यांचा कॅमेरामन आणि स्वतः वसंत मोरे रस्त्याच्या बाजूला धावल्याने ते बचावले. त्यांनी प्रशासनवर टीका केली आहे. राज्य सरकारने ३० किमी/तास गती मर्यादेचा निर्णय घेतल्यानंतर कात्रज परिसरामध्ये प्रचंड ट्रॅफिक वाढले आहे. स्पीड कमी केल्यामुळे जवळपास ५०% ट्रॅफिक हे जांभळवाडी पुलाच्या दिशेने न जाता कात्रजच्या घाटातून येत आहे. प्रशासनाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मोरे यांनी म्हटले आहे.