पुणे महापालिका अधिकार्‍याला एक लाखाचा ‘शॉक’!

पुणे महापालिका अधिकार्‍याला एक लाखाचा ‘शॉक’!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांच्या नावे व्हॉटसअ‍ॅपवर आलेल्या बनावट मेसेजमुळे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याची एक लाखांची फसवणूक झाली आहे. पालिकेच्या अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनाही आजी-माजी आयुक्तांच्या नावाने थेट पैशांची मागणी करणारे मेसेज आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

माजी आयुक्त कुणाल कुमार यांच्या नावाने अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर गत आठवड्यात मेसेज आले होते. त्यात संबधित मोबाईल क्रमांकावर कुमार यांचा डीपी असल्याने अनेकांना हा त्यांचा नवीन मोबाईल नंबर असल्याचे वाटले. या मेसेजमध्ये मी एका ठिकाणी कॉन्फरन्स मीटिंगसाठी आलो आहे. या कॉन्फरन्समध्ये देण्यासाठी तातडीने अ‍ॅमेझॉनची दहा हजारांची प्रत्येकी दहा गिफ्ट वाऊचर हवी आहेत असे सांगितले. मात्र, एका अधिकार्‍याला हा बनावट मेसेज असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट दिल्लीत असलेल्या कुमार यांच्याशी संपर्क साधून खातरजमा केली. त्यानंतर त्यांनी अधिकार्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अशा पद्धतीचे बोगस मेसेज येत असल्याचे कळविले.

दरम्यान, एक खाते प्रमुख वरिष्ठ अधिकारी मात्र कुटुंबीयांसमवेत हा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परराज्यात गेले होते. त्यांनाही कुणाल कुमार यांच्या नावाचा मेसेज गेल्याने त्यांना पुण्यात मुलाला कॉल करून संबंधित मोबाईल क्रमांकावर अ‍ॅमेझॉन कंपनीचे प्रत्येकी 10 हजार रुपयांचे दहा व्हाऊचर पाठविण्यास सांगितले. सोमवारी पुण्यात आल्यानंतर त्यांनी मुलाला हे व्हाऊचर पाठविले का? अशी विचारणा केली. त्यावर त्यांच्या मुलाने हे व्हाऊचर पाठविले असल्याचे सांगितले.

कामावर आल्यावर फसवणूक समजली

संबंधित अधिकारी मंगळवारी कामावर आल्यानंतर त्यांनी महापालिकेतील इतर अधिकार्‍यांना हा प्रकार सांगितला. त्यावर इतर अधिकार्‍यांनी आम्हालाही असे मेसेज आले होते. मात्र, तो नंबर कुणाल कुमार यांचा नव्हता. तर बनावट होता, असे सांगितले. त्यानंतर संबंधित अधिकार्‍याला मात्र आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने चांंगलाच शॉक बसला. मात्र, याबाबत अद्याप त्यांनी पोलिस तक्रार दिली नसल्याचे सांगितले. दरम्यान, या फसवणुकीच्या प्रकाराची मंगळवारी पालिकेत चांगलीच खुमासदार चर्चा सुरू होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news