

PMC Elections 2026
"आम्ही सत्तेत आलो तर पुण्यात महिलांना मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत देणार आहोत. राज्य सरकारच्या योजनांसाठी आम्ही आमच्या अर्थसंकल्पातील १० टक्के खर्च करत असतो. या विशिष्ट योजनेसाठी महापालिक त्यांच्या अर्थसंकल्पातून केवळ २ ते २.५% खर्च करावा लागतो. महापालिकांनी दोन ते अडीच टक्के भार उचलून पुण्यातील वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण कमी होणार असेल. दररोज रस्त्यावर उतरणारी १० लाख वाहन कमी होत वेळेची बचत होणार असेल तर ही योजना आर्थिक दृष्ट्याही लाभदायकच ठरणार आहे, अशा शब्दांमध्ये मोफत मेट्रो आणि पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याच्या आश्वासनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले. 'पुढारी न्यूज'शी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडलं.
अजित पवार म्हणाले की, "आम्ही महानगरपालिकेच्या सत्तेत आलो तर पुण्यात महिलांना मेट्रो आणि बसचा प्रवास आम्ही मोफत देणार, असे आश्वासन मी काहीतरी सांगायचं म्हणून दिलेले नाही. मी राज्याचा 11 वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतोय. आम्ही पुणे शहराचा विकास करताना तज्ज्ञ लोक, काही निवृत्त अधिकारी, प्रत्यक्ष काम करणार्यांबरोबर चर्चा केली. सगळ्यांशी याबाबत उभं-आडवं-तिरकं सगळं विचारपूर्वक करूनच निर्णय घेतला. मला ज्यावेळेस पटलं की हे मी करू शकतोय आणि इतरांनी पण सांगितलं की हे असं होऊ शकतं, त्यानंतर हा निर्णय मी जाहीर केला आहे."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच म्हटलं होतं की, अजित पवार बोलतात आणि आमचं काम बोलतं. यावर अजित पवारांनी स्पष्ट केले की, "त्यांनी काय बोलाव तो त्यांचा अधिकार आहे. मी त्यांच्यावर आक्षेप कसा घेऊ शकतो. अजित पवार कामाचा माणूस आहे? की बोलणारा माणूस आहे, हे राज्यातील जनतेला माहिती आहे."
महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांची मागणी होती की, शिवसेनेबरोबर युतीसाठी प्रयत्न करावेत.आम्ही प्रयत्न केला;पण शिवसेनेने भाजपाबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणी कार्यकर्त्यांना कळलं की, आपली आता इथे युती होत नाही; मग मताची विभागणी टाळावी यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रपणे निवडणुकीला सामोर जाण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही अजित पवारांनी यावेळी नमूद केले.
महायुती सरकारमध्ये कधी एकनाथ शिंदे नाराज तर कधी अजित पवार दिल्ली दौर्यावर, अशा चर्चा असतात यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, "राज्यामध्ये असणारे महायुती सरकार अत्यंत स्थिर आहे. कोणीही काळजी करु नये. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर हा पुण्याचा नागरिक असेल. आम्ही जात, पात धर्मबघून पद देणार नाही. पुण्यात निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांशी चर्चा करून बहुमताचा आदर करून आम्ही निर्णय घेऊ."