पुणे : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण कॉटनची, हाताने घडवलेली पगडी, त्यावर पंचधातूंचा वापर करून बनवलेली शुभचिन्हे, मध्यभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा… अशी खास दिग्विजय योद्धा पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यातील सभेदरम्यान घालण्यात आली. मोदींच्या स्वागतासाठी ही विशेष पगडी तयार करण्यात आली होती. ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणार्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजविलेल्या या पगडीने पुणेकरांचे लक्ष वेधले.
पुण्यात आत्तापर्यंत झालेल्या सभांमध्ये मोदी यांचे स्वागत विविध पगडी घालून करण्यात आले असून, यंदाच्या सभेतही दिग्विजय योद्धा पगडी चर्चेचा विषय ठरली. ही पगडी मुरुडकर झेंडेवालेचे गिरीश मुरुडकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली. मुरुडकर म्हणाले, ही पगडी हाताने तयार केली आहे. कॉटन कापडामध्ये ही पगडी तयार केली असून, गेल्या काही दिवसांपासून आमचे कारागीर त्यासाठी मेहनत घेत होते. यातील शुभचिन्हे पंचधातूंनी साकारण्यात आली आहे. सोने, चांदी, पितळ, लोह, तांबे अशा पंचधातूंपासून शुभचिन्हे बनवली आहेत. दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी आहे.
हेही वाचा