

वाल्हे : पितृपक्षाचा पंधरवडा सोमवार (दि. 8) पासून सुरू झाला आहे. त्यामुळे वाल्हे (ता. पुरंदर) येथील मंगळवारच्या आठवडे बाजारात भाजीपाल्याचे बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, या बाजारात मोठी गर्दी दिसून आली होती.
पितृपक्षामुळे नैवेद्यासाठी लागणार्या गवार, भेंडी, लाल भोपळा, कारले, काकडी, मेथी, अळूची पाने, डाळिंब आदींची मागणी वाढल्याचे व्यापार्यांनी सांगितले. तसेच गावात भाजी मंडई किंवा बाजार नसल्याने या आठवडे बाजारात मंगळवारी (दि. 9) गर्दी दिसून आली. (Latest Pune News)
यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस समाधानकारक झाल्याने वाल्हे व परिसरातील ओढे-नाले भरून वाहत आहेत. यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतातील पिकेही जोमात आली आहेत. दुसरीकडे मान्सूनचा पाऊस चांगला झाला नाही. परिसरात गेल्या आठवड्यापासून कडक ऊन पडत असल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहेत.
यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने शेतात भाजीपाल्याच्या पिकाला फटका बसला आहे. आता पितृपक्षात लागणार्या सर्वच भाजीपाल्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढत असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
वाल्हे बाजारातील दर पुढीलप्रमाणे : मेथीला 25 ते 30 रुपये प्रतिजुडी असा बाजारभाव मिळाला. किरकोळ बाजारात हिरवी मिरची 80 रुपये, कोथिंबीर जुडी 20, टोमॅटो 40, शिमला मिरची 80, काकडी 40, आले 100, कोबी 20, फ्लॉवर 60 रुपये प्रतिकिलो विक्रीला आहे. गवार 160, मटार 80, कारली 80, दोडके 80, वांगी 70, भेंडी 70, लाल भोपळा 100, कांदा 30 ते 40 रुपये किलो.
पितृपंधरवड्यात तेल, साखर व बेसन दरवाढ झाली असून, बुंदी, लाडू देखील महाग झाले आहेत. परिणामी, अन्नदानाचा खर्च वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. सध्या पितृपंधरवड्याचा काळ सुरू असून, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. विशेषतः बुंदी व लाडू या गोड पदार्थांचे वाटप अधिक प्रमाणात केले जाते. परंतु, गेल्या
15 दिवसांत तेल, साखर व बेसन पिठाचे दर वाढल्याने या गोड पदार्थांचे दर देखील हॉटेल चालकांनी झपाट्याने वाढवले आहेत.
पितृपंधरवडा (पितृपक्ष) 2025 चा आरंभ 7 सप्टेंबरपासून झाला आणि त्याचा समारोप रविवारी (दि. 21) होणार आहे. पितृपंधरवड्यात तेलाचा भाव 120 वरून 130 ते 135 रुपये प्रतिलिटर, साखर 40-41 वरून 44 रुपये व बेसन 81 वरून 85 ते 86 रुपये किलो झाले आहे. परिणामी, 120 ते 135 रुपये किलो मिळणारी बुंदी आता 140 ते 160 रुपयांना तर लाडूचे दरदेखील त्या आसपास आहेत. या दरवाढीमुळे पितृपंधरावड्यातील अन्नदानाच्या खर्चात वाढ झाली असून, ग्राहक आणि विक्रेते दोघेही चिंतेत आहेत. आगामी नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारातील ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांना या दिवसांत या भाववाढीचा फटका बसत आहे. बाजारातील काही भाज्यांचे भाव स्थिर आहेत, तर काहींचे भाव 20 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. बहुतेक सर्व भाज्या महाग झाल्यामुळे गृहिणींचे बजेट विस्कळीत झाले आहे.
दरवाढीमुळे अन्नदानाचे बजेट बिघडले आहे. बुंदी, लाडूसारखे पदार्थ घेणे कठीण झाले असून, पितृपंधरवड्याच्या पारंपरिक वाटपावर मर्यादा आणाव्या लागतील.
- नित्यानंद येवले, उद्योजक, गंगापूर
तेल, साखर आणि बेसन महाग झाल्यामुळे बुंदी, लाडू बनवण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. नाइलाजाने भाव वाढवावे लागत आहेत, नाहीतर तोटा सहन करावा लागेल.
- सोमनाथ आणि मारुती विष्णू शिंदे, श्रीराम हॉटेल, पिंपळगाव-खडकी