

दीपक सोनवणे
पौड : मुळशी तालुक्यातील पिरंगुट-भूगाव जिल्हा परिषद गटात ’राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ अशी लक्षवेधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. या गटात शिवसेना (उबाठा) आपली ताकद पणाला लावण्याच्या तयारीत आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसही आपले उमेदवार या गटात देणार असल्याने येथील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
या गटात जिल्हा परिषद सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सभापती महादेव अण्णा कोंढरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य शांतारामदादा इंगवले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिव आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब शेळके, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अमित कुडले हे इच्छुक आहेत.
पिरंगुट-भूगाव गटातील इच्छुक उमेदवारांनी सध्या गावभेट दौऱ्यावर भर दिला आहे. वैयक्तिकरीत्या मतदारांना भेटून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. विविध कार्यक्रमांबरोबरच गावोगावी सुरू असलेल्या काकड आरतीला भावी सदस्य हजेरी लावत आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पिरंगुट-भूगाव गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. पिरंगुट व भूगाव गणात सर्वसाधारण आरक्षण आहे. त्यामुळे अनेक भावी जिल्हा परिषद व भावी पंचायत समिती सदस्य हे गट व गणातील कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत आहेत. हा गट राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. 2007, 2012 आणि 2017 मध्ये जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आला होता. या गटावर गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाते. यंदा पक्षातील फुटीमुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समोरासमोर येणार आहेत.
पूर्वीचा पिरंगुट-बावधन असा हा गट होता. यामधील बावधन आणि सूस गावचा समावेश महापालिकेत झाल्याने नव्याने पिरंगुट-भूगाव गट झाला आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अंजली कांबळे विजयी झाल्या होत्या. पिरंगुट गणातून राष्ट्रवादीच्या राधिका कोंढरे, तर बावधन गणातून शिवसेनेचे विजय केदारी विजयी झाले होते. आगामी निवडणुकीसाठी या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र आहे.
या गटात भूगाव, भुकूम, लवळे, पिरंगुट, कासारआंबोली, उरवडे ही मोठी गावे येतात. मुठा खोरे आणि लवासा परिसर या गटात समाविष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष व मुळशीचे माजी सभापती महादेव अण्णा कोंढरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार शंकर मांडेकर यांचे विश्वासू सहकारी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम दादा इंगवले आणि निष्ठावान शिवसैनिक आबासाहेब शेळके यांनी उमेदवारी अंतिम समजून प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेना, भाजप आणि काँग्रेस उमेदवाराच्या शोधात आहेत.