पिंपरी-निगडी मेट्रोचे काम लवकरच मार्गी : उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी-निगडी मेट्रोचे काम लवकरच मार्गी : उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होईल. एका मंत्र्यांची सही राहिली असून, त्यासाठी मी स्वत: नवी दिल्लीत जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि.24) दिली. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरतीसाठी उपमुख्यमंत्री पवार रविवारी पिंपरी-चिंचवडच्या दौर्‍यावर होते. दिवसभर त्यांनी विविध मंडळांतील गणपतींचे दर्शन घेतले. पिंपरी येथील महापालिका भवन ते निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक हा 4. 413 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पिंपरीपासून पुण्यातील रूबी हॉल व वनाजपर्यंत मेट्रो सुरू झाली आहे. मात्र, दापोडी ते निगडी अशी सलग मेट्रो सुरू न झाल्याने शहरवासीयांमध्ये नाराजीचा सूर आहे.

संबंधित बातम्या : 

त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामासाठी केवळ एका मंत्र्यांची सही राहिली आहे. ती झाली की काम सुरू होईल. तसेच, स्वारगेट ते निगडी हे कामही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांसोबतच्या छायाचित्रावर बोलण्यास नकार देत, विकासासंदर्भातील प्रश्न विचारा, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, राज्यासह पिंपरी-चिंचवड शहराचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्या कामांना गती देण्यासाठी मी 15 दिवसांतून एकदा आढावा बैठक घेत आहे. अडचणी दूर करून ती कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी चिंचवड येथे मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेऊन दौर्‍यास सुरूवात केली. पदाधिकार्‍यांनी त्यांचे शहरात जंगी स्वागत केले. क्रेनला अडकविलेले मोठमोठे पुष्पहार व जेसीबीतून फुलांचा वर्षाव करत जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच, शहरभरात मोठे फ्लेक्स झळकत होते.

शहरभरात फिरून विविध गणेश मंडळाचे दर्शन त्यांनी घेतले. निगडी, यमुनानगर, तळवडे, चिखली, ताम्हाणे वस्ती, बोर्‍हाडेवाडी, मोशी, चर्‍होली, दिघी, भोसरी, लांडेवाडी, संत तुकारामनगर, दापोडी, पिंपरी गाव, चिंचवड, मोहनगर, रामनगर, काळभोरनगर, प्राधिकरण, वाल्हेकरवाडी, मामुर्डी, वाकड, रहाटणी, थेरगाव, काळेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, नवी सांगवी, सांगवी, पिंपळे गुरव येथील गणेश मंडळांना भेट देऊन त्यांनी गणपतीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व माजी नगरसेवकांशी संबंधित ही मंडळे आहेत. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. ठिकठिकाणी त्यांना नागरिकांनी निवेदन व पत्रे दिले. मंडळ भेटीचा हा कार्यक्रम रात्री उशीरायर्पंत सुरू होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news