पिंपरी : वाकड येथील रखडलेल्या अर्धवट डीपी रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पालिकेच्या स्थापत्य, नगररचना व प्रकल्प विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि भाजप पदाधिकार्यांनी रस्त्यांची पाहणी करत शेतकार्यांशी वाटाघाटीबाबत सकारात्मक चर्चा केली. तसेच, वाकड दत्त मंदिर रस्त्याच्या कामाचादेखील आढावा घेण्यात आला आहे. रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे यांनी या पाहणी दौर्याचे आयोजन केले होते. या वेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, स्थापत्यचे देवण्णा गट्टूवार, संध्या वाघ, भाजप प्रदेश सदस्य संतोष कलाटे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, अमोल कलाटे, रणजित कलाटे, विनोद कलाटे, प्रसाद कस्पटे, उपअभियंता विजयसिंह भोसले, नगररचनाचे अशोक कुटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
काळाखडक ते फिनिक्स मॉलकडे जाणारा 24 मीटर रुंदी व एक कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काम दोन्ही बाजूंनी पूर्ण झाले असून, येथील कस्तुरी टॉवरजवळ दीडशे मीटरचे काम रखडले आहे. शोनेस्ट टॉवर सोसायटी ते फिनिक्स मॉल 24 मीटर रुंदीच्या रस्त्याचेदेखील दोन्ही बाजूंचे काम झाले असून, भूसंपादनाअभावी शोनेस्ट सोसायटीपासून कलाटे गार्डनपर्यंत काम ठप्प आहे. उत्कर्ष चौक ते सयाजी अंडरपासकडे जाणार्या 18 मीटर रस्त्याचे काम ईडन सोसायटीपर्यंत रखडले आहे. या तीनही रस्त्यातील अगदी किरकोळ जागेच्या ताब्याअभावी काम होऊनही रस्ता वापरात नाही. आम्ही शेतकर्यांसोबत वाटाघाटीसाठी सकारात्मक चर्चा केली आहे. त्यातूनही प्रश्न न सुटल्यास भूसंपादन कायद्यानुसार प्रक्रिया राबवून जागा ताब्यात घेत रस्ता पूर्ण
करणार असल्याचे अधिकार्यांनी या वेळी सांगितले.
सर्वांची डोकेदुखी ठरलेल्या वाकड-दत्त मंदिर रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विकासास पूरक असणार्या रस्त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका अधिकारी शेतकर्यांशी समन्वय साधून रस्ता पूर्ण करण्याचे काम सुरू केले आहे. येत्या चार महिन्यांत काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजप
या भागात लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. इथे एक मोठा एक मॉलदेखील झाल्याने कोंडीमुळे मन:स्ताप होत आहे. येथील समस्या लक्षात यावी, या तीनही रस्त्यांचे काम त्वरित पूर्ण व्हावे, म्हणून भाजप पदाधिकारी व महापालिका अधिकार्यांना येथे पाहणीसाठी बोलावले होते. समन्वयाने हा प्रश्न सोडवून नागरिकांची गैरसोय दूर करण्याचे प्रयत्न आहेत.
– स्नेहा कलाटे, अध्यक्षा, रणजित आबा कलाटे फाउंडेशन
आम्ही येथील सर्व रस्त्यांची पाहणी केली आहे; तसेच येथील शेतकर्यांशी चर्चादेखील केली आहे. त्यांच्या मागण्यांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या जागेच्या मोबदल्याबाबत योग्य तोडगा निघाल्यास शेतकरी अ, ब पत्र द्यायला तयार आहेत. त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
– अशोक कुटे, उपअभियंता, नगररचना विभाग
हेही वाचा