

पिंपरी : महापालिकेच्या पिंपरी-अजमेरा कॉलनी येथील नेत्र रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांसाठी महिनाभराचे वेटिंग असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. तर, सर्जन आणि आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने डोळ्यांच्या मागील पडद्याच्या (रेटिना) शस्त्रक्रियाच होत नसल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिका प्रशासनाने मोठा बडेजाव करून अजमेरा कॉलनी येथे नेत्र रुग्णालय सुरू केले.
त्यामुळे आता डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना वेग येईल, रुग्णांची गैरसोय दूर होईल, असे वाटत होते. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळीच आहे.
वायसीएममध्ये हाडांच्या शस्त्रक्रियांसाठी वेटिंग महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हाडांच्या विविध शस्त्रक्रियांसाठी सध्या 7 ते 15 दिवसांचे वेटिंग आहे. येथील 2 शस्त्रक्रिया कक्षांमध्ये आठवड्याला 24 ते 25 शस्त्रक्रिया होत आहेत.
नेत्र रुग्णालयात शस्त्रक्रियांसाठी एकूण 3 शस्त्रक्रिया कक्ष आहेत. मात्र, त्यातील 2 शस्त्रक्रिया कक्षच सध्या वापरात आहे. तिसर्या शस्त्रक्रिया कक्षात मायक्रोस्कोप नसल्याने ते वापराशिवाय पडून आहे. 2 शस्त्रक्रिया कक्षांच्या माध्यमातून सध्या दिवसाला 14 ते 15 शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. येथे सध्या 3 पूर्णवेळ सर्जन आहेत. त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. रेटिनाच्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णालयात सर्जन आणि आवश्यक साहित्यच उपलब्ध नाही. त्यामुळे या शस्त्रक्रियांना अटकाव बसला आहे.
वायसीएम रुग्णालयात दोन मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या माध्यमातून हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भूल देण्यासाठी शरीर योग्य स्थितीत आहे की नाही, हे तपासावे लागते. त्यामुळे त्यासाठी वेळ लागतो. त्याचा परिणाम या शस्त्रक्रियांसाठी वेटिंग वाढत आहे.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.
मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी सध्या महिनाभराचे वेटिंग आहे. येथील तिसर्या शस्त्रक्रिया कक्षासाठी मायक्रोस्कोप उपलब्ध झाल्यानंतर त्याचाही वापर करता येईल. रेटिनाच्या शस्त्रक्रियांसाठी सर्जन आणि आवश्यक साहित्य मिळाल्यानंतर या शस्त्रक्रिया करता येतील.
– डॉ. रुपाली महेशगौरी,
नेत्ररोग विभागप्रमुख,
नेत्र रुग्णालय, अजमेरा कॉलनी.
हेही वाचा