पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या सलग दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) सर्व्हर बंद पडल्याने कामकाज ठप्प झाले आहे. आरटीओच्या कामासाठी सुटी काढून आलेल्या नागरिकांना सर्व्हर बंदचा मोठा फटका बसल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरटीओ कार्यालयात नवीन वाहन परवाना काढणे, कर्जाचा बोजा चढवणे-उतरवणे, परवान्याचे नूतनीकरण, रिक्षाचे परमिट तसेच वाहन ट्रान्सफरची कामे ऑनलाइन सुरू असतात.
सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांत आरटीओ कार्यालयात सर्व्हर बंद असल्याने कामकाज ठप्प होते. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, ऑनलाइन परीक्षांसह इतर विविध कामे सर्व्हर ठप्पमुळे खोळांबली होती. नागरिक सकाळपासून सायंकाळपर्यंत आरटीओ कार्यालयात बसून होते. काही नोकरदार खास आरटीओतील कामासाठी सुटी घेऊन आले होते, तर महाविद्यालयीन विद्यार्थीही ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी आले होते. पण, सर्व्हर बंद असल्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.आठवडाभरात तीन ते चार दिवस सर्व्हर बंद असल्याने आम्हांला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे याठिकाणी कामानिमित्त आलेले नागरिकांचे म्हणणे आहे.
दिवसभरात किमान दोनशे ते तीनशे नागरिक शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात येतात. परंतु सर्व्हर डाउनचा फटका बसल्याने या नागरिकांना परत जावे लागले.
संपूर्ण देशातच हा सर्व्हर डाउनचा फटका बसल्याची माहिती कार्यालयातील अधिकार्यांनी दिली. सर्व्हरच्या खोळंब्यामुळे सर्वत्र नागरिक हवालदिल झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा