घर फिरले की घराचे वासेही फिरले ! पवारांच्या वाढदिवसाचा जल्लोष कमीच !
बारामती : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस यापूर्वी बारामतीत नेहमीच धुमधडाक्यात साजरा होत आला आहे. कर्मभूमी असलेल्या बारामतीकरांची त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी चढाओढ लागलेली असायची. यंदा मात्र पक्षातील फुटीनंतर दरवर्षीप्रमाणे वाढदिवसाचा जल्लोष बारामतीत दिसला नाही. शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांनी सामाजिक उपक्रम घेतले, परंतु ते मर्यादित स्वरुपातील राहिले. शरद पवार यांच्यामुळे बारामतीचे नाव सर्वदूर पोहोचले. गेल्या वीस वर्षांच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर बारामतीचा झपाट्याने विकास झाला ही बाब खरी असली तरी शरद पवार यांच्या पुढाकारानेही या भागाचा मोठा कायापालट झाला. मोठे उद्योजक त्यांच्यामुळेच बारामतीत आले. आंतरराष्ट्रीय कंपन्या आल्या. बारामती शहर व तालुक्यात अनेकांना उद्योग-व्यवसाय उभारणीत शरद पवार यांनी मोठी मदत केली. त्यांचा शब्द मोडला जात नसल्याने अनेक उद्योगपती बारामतीत आले. त्याचा फायदा बारामती परिसराला झाला. पवार यांनी केंद्रातील सत्तेत असताना, राज्यात मुख्यमंत्रिपदी असताना बारामतीतील अनेक संस्थांना भरीव मदत केली.
संबंधित बातम्या :
परिणामी या संस्थांना आर्थिक स्थैर्य लाभत त्या बलवान झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मात्र येथील सर्वच संस्था, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे जाणे पसंत केले. परिणामी दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा शरद पवार यांचा वाढदिवस यंदा तशा जल्लोषात साजरा होताना दिसला नाही. पवार यांचा वाढदिवस म्हटले की महिनाभर कार्यक्रम चालायचे. त्यात रक्तदान शिबिरापासून ते अनेक मोठ्या कार्यक्रमांचा समावेश असायचा. यंदा शरद पवार गटाकडून वाढदिनी महाभिषेक, केक कापण्याचा कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांना साहित्य वाटपासह अन्य छोटे कार्यक्रम झाले. परंतु दरवर्षीप्रमाणे असलेली भव्यता त्याला नव्हती. 'घर फिरले की घराचे वासे फिरतात', याचा अनुभव यानिमित्ताने सामान्य बारामतीकरांना आला. ज्यांच्या नावामुळे या शहराची, तालुक्याची ओळख निर्माण झाली, त्यांच्याच बाबतीत एवढा अचानक झालेला बदल सामान्य बारामतीकरांना विचार करायला लावणारा ठरला.