पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पवना, मुळा, इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांकडून पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी (दि. 11) निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी पर्यावरणप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. पिंपरी येथील डॉ. आंबेडकर चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनचालकांना निदर्शनांचे फलक दाखवून जनजागृती करण्यात आली.
पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांमध्ये परिसरातील कंपन्यांद्वारे प्रदूषित व रसायनयुक्त पाणी बेकायदेशीरपणे सोडण्यात येत आहे. तसेच, परिसरातील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटमध्ये बंद असलेल्या एसटीपी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी बेकायदेशीरपणे नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नाल्यांद्वारे थेट नद्यांमध्ये सोडण्यात आल्याने या नद्यांना विशाल नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या नद्या वारंवार फेसाळण्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार केली आहे. पालिका प्रशासन वेळकाढू पद्धतीने काम करत आहे, असा आरोप सहभागी नागरिकांनी केला.
नद्यांमध्ये सोडलेल्या प्रदूषित पाण्यामुळे मानवी जीवनासह नद्यांवर अवलंबून असलेल्या जैवविविधतेवर दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती, संस्थांवर गुन्हा दाखल करावा. तसेच, स्थानिक प्रशासनाला या घटनेसाठी जबाबदार धरून संस्था व त्यांच्या प्रमुखावर देखील गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
हेही वाचा