प्रदूषणामुळे डोळे चुरचुरतात? कशी घ्यावी काळजी? | पुढारी

प्रदूषणामुळे डोळे चुरचुरतात? कशी घ्यावी काळजी?

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीपासून ते महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत अनेक शहरांमध्ये सध्या प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. सततचा खोकला, सर्दी आणि डोळे चुरचुरणे अशा समस्यांना समोरं जाव लागतंय. प्रदूषित हवेमुळे लोकांचे जगणं कठीण झाले असून त्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहे. दिल्लीमध्ये मास्क घातल्याशिवाय बाहेर फिरणं अवघड झाले आहे. अशातच तुम्हालाच तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमचे डोळे निरोगी ठेवायचे असतील तर दररोज नियमित उपाय करणं गरजेचे आहे. हवेतील प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होऊ लागतात आणि डोळ्यांचे आजारही झपाट्याने वाढत आहेत. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हे उपाय असे… प्रदूषणामुळे डोळ्यांना होणारे नुकसान टाळण्यासाठी घराबाहेर पडणे टाळा आणि महत्त्वाचे काम असेल तेव्हाच बाहेर जा. सध्या बर्‍याच गोष्टी ऑनलाईन पद्धतीने होत असतात. त्यामुळे घरीच राहून काम होत असेल तर त्यावर भर द्या. घरातून बाहेर जाताना मास्क तर तुम्ही घालतच असाल. पण त्याचबरोबर तुम्ही चष्मा देखील वापरू शकता. त्यामुळे हवेतील कण डोळ्यांच्या संपर्कात येण्यापासून रोखले जातात. प्रवास करण्याची वेळ आली तर तुम्ही दर अर्ध्या तासाने डोळे धुतले पाहिजे.

डोळ्यांची जळजळ किंवा अ‍ॅलर्जी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ड्रॉप घ्या. हातांनी डोळ्यांना स्पर्श करणे टाळा. त्यामुळे डोळ्यांना अलर्जी होणार नाही, याची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. शहरी भागात वायू प्रदूषणापासून आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि भाज्या खा. त्याचबरोबर विकेंडला तुम्ही शहरातून निसर्गाच्या सान्निध्यात बाहेर थांबू शकता. दरम्यान, प्रदूषणामुळे बहुतांश लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे. विषारी हवेमध्ये स्वतःला तंदुरुस्त ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरामध्ये काही झाडे ठेवू शकता ज्यामुळे घराची हवा स्वच्छ होते.

Back to top button