वडगाव मावळ : येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या आवारातील भिंतीवर व देवस्थानच्या जागेवर फ्लेक्स, बोर्ड लावण्यास मनाई करण्यात आली असून, नगरपंचायतनेही संबंधित ठिकाणी फ्लेक्स किंवा बोर्ड लावण्यास परवानगी देऊ नये, असे देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे. दरम्यान, मध्यवस्तीतून जुना मुंबई-पुणे रोड जात असून, देवस्थानच्या पूर्वेकडील महादेवाचे मंदिर भिंत ते पश्मिचमेकडील सोन्या-चांदीचे व्यापारी (चोरडिया) यांच्या दुकानापर्यंत मंदिराची भिंत आहे. ही भिंत कठडा 5 फूट उंचीचा आहे. त्या ठिकाणी देवस्थानच्या मालकीच्या जागेवर बोर्ड लावण्यास मनाई केलेली आहे व तसा हुकूम नोटीस बोर्डवर लावलेला आहे.
तसेच, देवस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस ठाणे, ग्रामपंचायत यांना वेळोवेळी समज दिलेली आहे व बोर्ड लावण्यास परवानगी दिलेली नाही. परंतु, नगरपंचायत आल्यानंतर बोर्डाचे पैसे घेऊन परवानगी देण्यात येत आहे. हे सर्व चुकीचे काम चालू आहे. या पवित्र ठिकाणी भंग होऊ नये, यासाठी नगरपंचायतीने तातडीने निर्णय घेऊन बोर्ड लावण्यास मनाई करावी, असे लेखी पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे.
शहरात कोणतेही फ्लेक्स, बोर्ड, जाहिरात फलक लावण्यासाठी आधी नगरपंचायतकडून फी भरून परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नुकताच मुख्याधिकारी डॉ. निकम यांनी दिला असून, परवानगी घेऊन फ्लेक्स लावण्यासाठी काही सार्वजनिक जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध केले असून प्रशासनानेही सूचना फलक लावले आहेत.
हेही वाचा