रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद
Published on
Updated on

शिरूर: पुढारी वृत्तसेवा : शंभरहून अधिक नागरिकांची सोने खरेदी-विक्रीत फसवणूक करून पसार झालेल्या परप्रांतीय सोनाराला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथून ताब्यात घेऊन कायदेशीर बाबींची पूर्तता करून नागरिकांना सोन्याचा ऐवज परत केला, ही बाब कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोनाराने फसवणूक केलेल्या नागरिकांना सोने व ऐवज परत करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, रांजणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण, शिरूरचे निरीक्षक संजय जगताप, शिक्रापूरचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, उपनिरीक्षक सुहास रोकडे, निळकंठ तिडके, अनिल मोरडे, शुभांगी कुटे, शिवाजी मुंढे, कारेगावच्या सरपंच निर्मला नवले, महिला दक्षता समिती अध्यक्षा सुलभा नवले, मनीषा नवले आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत मनीषा रामचंद्र नवले यांनी फिर्यादी दिली होती. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनानुसार व पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या सूचनेनुसार तपास सुरू केला असता आरोपी प्रताप परमार उर्फ नरपतसिंह मोहब्बतसिंह रजपूत (वय 40, मूळ रा. चामुंडेरी, ता. जि. पाली, राजस्थान) या सोनाराचा मोबाईलही बंद लागत होता. आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.
रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास रोकडे, जवान उमेश कुतवळ यांनी या आरोपीचा कटोसन (ता. कडी, जि. अहमदाबाद, गुजरात) येथे जाऊन शोध घेतला.

त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या एका कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर परमार याचे नाव आणि नवीन मोबाईल नंबर मिळून आला. त्या आधारे सुहास रोकडे यांनी या दुकानामध्ये नवीन कपडे खरेदीचा बहाणा करीत जाऊन माहिती काढली असता हे कपड्याचे दुकान हे परमार याचेच असल्याची खात्री झाली. रोकडे यांनी कपडे खरेदी झाल्यानंतर दुकानाच्या शेठला भेटायचे आहे, असे सांगत परमार याला ताब्यात घेतले. परमारकडे तपास केला असता त्याने फिर्यादीसह इतर 150 ते 160 नागरिकांची एकूण 100 तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

परमार याने सोन्याचे दागिने हे कारेगाव येथील ओंकारबाबा ग्रामीण निधी लि. या पतसंस्थेत तसेच त्याचा ज्वेलर्स दुकानाचा जुना भागीदार कुमार चंद्रकांत ओव्हाळ (रा. शिंदोडी, ता. शिरूर) यांच्याकडे ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. रांजणगाव पोलिसांनी आत्तापर्यंत त्याच्याकडून 54 लाख 69 हजार रुपये किंमतीचे 91 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने या गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त केले आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसीचे निरीक्षक महेश ढवाण, उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, जवान उमेश कुतवळ, विजय शिंदे, हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, माणिक काळकुटे, तेजस रासकर यांनी केली आहे.

पोलिस अधीक्षकांकडून कौतुक
गेल्या सहा महिन्यांमध्ये रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अनेक गुन्हे उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले व अनेक गुन्ह्यांना आळा घातला, याचे कौतुक करत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलिस निरीक्षक महेश ढवाण व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news