Pimpri News : विक्रेत्यांच्या भोंग्यांमुळे नागरीक त्रस्त !

Pimpri News : विक्रेत्यांच्या भोंग्यांमुळे नागरीक त्रस्त !

नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी परिसरातील शांतता विक्रेत्यांच्या भोंग्यांमुळे भंग पावत आहे. दिवाळीच्या, सणासुदीच्या काळात; तसेच दिवाळी संपलेली असतानाही भांडी, कपडे, घरगुती वस्तू, भाजीपाला इत्यादींची विक्री करणारे विक्रेते परिसरातील चौकांमध्ये, अंतर्गत रस्त्यांवर, रस्त्याकडेला कर्णकर्कश भोंगा लावून जाहिरात करतात. त्यामुळे परिसरातील शांतता भंग पावत आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.

  •  पूर्वी फिरस्त्या व्यावसायिकांचा वावर गावांत, गल्लीत तसेच चौकांमध्ये असायचा. त्यात मोडीवर भांडी, केसावर फुगे, फळ, भाजीपाला, कुल्फी आदींबाबत व्यावसायिक ओरडून आपला माल विकत असत; परंतु सध्या आपल्याला ओरडण्याचा त्रास नको म्हणून हे व्यावसायिक इलेक्ट्रिक भोंगा लावून त्यावरून जाहिरात करत आहेत. त्याचा विपरीत परिणाम आज नागरिकांना भोगावा लागत आहे.
  •  चौकात सिग्नलला उभा राहिलो तरी आजूबाजूला असलेल्या व्यावसायिकांच्या कर्णकर्कश भोंग्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. बर्‍याच वेळा काही व्यावसायिक काही अंतरावर भोंगा सुरू करून ठेवतात. तो इलेक्ट्रिक असल्याने बटण सुरू केले की बंदच होत नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक व्यावसायिकांची देखील यामुळे डोकेदुखी वाढत चालली आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून परिचित आहे. सांगवी, पिंपळे गुरव परिसरात वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये काम करणारे चाकरमानी वास्तव्यास आहेत. साईचौक, कृष्णाचौक, काटेपुरम चौक, रामकृष्ण चौक, सृष्टी चौक, त्रिमूर्ती चौक आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी अशा भोंगा लावणार्‍या व्यावसायिकांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारण मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये यांना प्रवेश मिळत नाही.

परंतु गावभागातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बरेच चाकरमानी रात्रपाळी, सकाळ, दुपार या वेळेत कामावर जात असतात, त्यामुळे त्यांच्या झोपेची वेळ वेगवेगळी असते. अशा भोंग्यामुळे व फेरीवाल्यांमुळे शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. झोप व्यवस्थित न झाल्याने अनेक व्याधी जडत आहेत.

रुग्णांना नाहक मन:स्ताप

येथील परिसरातील महत्त्वाच्या चौकांत व्यावसायिक भोंगे लावून जाहिरात करत असतात. परंतु आजूबाजूला असलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा व्यावसायिकांमुळे चौकातील शांतता भंग पावत आहे. तसेच स्थानिक व्यावसायिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर घरांमधील नागरिकांनादेखील या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागत आहे.

मी कंपनीत कामाला आहे. मला कायम रात्रपाळीमध्ये काम करावे लागते. सकाळी घरी आल्यानंतर जेवण करून मी झोपतो. तर सकाळी दहा ते अकरानंतर या विक्रेत्या फेरीवाल्यांचा गल्लीत ये-जा सुरु असते. कर्णकर्कश आवाज, भोंगे यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांनी परिसरातील शांतता आबाधित राहील, याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.

– गोविंद पाटील, नवी सांगवी

सदर रस्त्याच्या कडेला, पदपथावर अतिक्रमण करून विक्रेते विक्री करीत असल्यास अतिक्रमण विभाग कारवाई करीत असते. भोंग्याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून कारवाई करण्यात येईल. नागरिकांना याचा नाहक त्रास होणार नाही, याची अतिक्रमण विभागाकडून दखल घेतली जाईल.

उमेश ढाकणे, ह क्षेत्रीय अधिकारी.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news