Pimpri News : रमाबाई आंबेडकर पुतळा उभारणी कामास टाळाटाळ

Pimpri News : रमाबाई आंबेडकर पुतळा उभारणी कामास टाळाटाळ

पिंपरी : माता रमाबाई आंबेडकर पुतळा स्मारकाचे कामासाठी 40 कोटी खर्चाची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, एक वर्ष उलटूनही काम सुरू करण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. याच्या निषेधार्थ माता रमाई स्मारक समितीतर्फे पालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळा भीमसृष्टी स्मारकामागील 20 ते 25 गुंठे जागा माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकासाठी राखीव आहे.

त्यासाठी तेथील अतिक्रमण हटवून त्या जागेस कुंपण घालण्यात आले आहे. स्मारकाच्या कामासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात 40 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, एक वर्ष होऊनही पालिका प्रशासनाकडून स्मारक उभारणीसाठी काहीच हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. स्मारकाबाबत प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
प्रशासनाच्या या उदासीनेचा निषेध करण्यासाठी आणि स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी समितीतर्फे पालिका भवनासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.

त्यात धुराजी शिंदे, अरूण मैराळे, संगीता भंडारी, माजी नगरसेवक सुरेश निकाळजे, सुधाकर वारभुवन, माजी नगरसेवक मारूती भापकर, मनसेचे शहरप्रमुख सचिन चिखले, सुनील ढसाळ, राजन नायर, अ‍ॅड. मिलिंद कांबळे, नीलध्वज माने, बापूसाहेब गायकवाड, दीपक लोखंडे, विशाल कसबे, सचिन दुबळे, दिनकर सोमवंशी, सूरज गायकवाड, रजनीकांत क्षीरसागर आदींनी सहभाग घेतला. खा. श्रीरंग बारणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या संदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा करतो, असे आश्वासन दिले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news