Pimpri News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची 10 किलोमीटर मार्गिका पूर्ण
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) माण-हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान साकारत असलेल्या मेट्रोसाठी 10 किलोमीटर मार्गिकेचे (व्हायाडक्ट) काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचे एकूण 55 टक्के काम आतापर्यंत मार्गी लागले आहे. मेट्रोचे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेच्या कामाला 25 नोव्हेंबर 2021 मध्ये सुरुवात झाली. माण ते वाकड, वाकड ते बाणेर, सकाळनगर ते सिव्हिल कोर्ट असा हा मार्ग असणार आहे. तिन्ही टप्प्यात हे काम सध्या वेगाने सुरू आहे.
पीपीपी तत्त्वावर साकारतोय प्रकल्प
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर एकूण 23 स्टेशन आहेत. ही मेट्रो पूर्णतः एलिव्हेटेड आहे. तसेच, या प्रकल्पाचे काम नागरिकांच्या खासगी सहभागातून (पीपीपी) केले जात आहे. 2017 च्या मेट्रो धोरणानंतर पीपीपी तत्त्वावर होणारा हा मेट्रोचा पहिलाच प्रकल्प आहे.
काम वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन
पीएमआरडीएकडून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी महानगर आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडून बैठका घेऊन नियोजन केले जात आहे. मेट्रोच्या कामामध्ये सध्या पायलिंग, पिअर वर्क केले जात आहे.
मेट्रो सुरू झाल्यानंतर होणारे फायदे
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान होणार वेगवान वाहतूक
हिंजवडी आयटी पार्कमधील आयटी अभियंते, कर्मचारी यांना मिळणार वाहतूक कोंडीमुक्त प्रवास
पुण्यावरुन वाकड, पिंपरी-चिंचवड येथे येणार्या प्रवाशांसाठी वाहतुकीचा दुसरा पर्याय खुला होणार
माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे एकूण 55 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर, 10 किलोमीटर अंतरातील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठी एकूण 7 हजार 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रोचे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करून मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी सुरु करण्याचे नियोजन आहे.
– राहुल महिवाल, महानगर आय, पीएमआरडीए.
हेही वाचा

