महावितरणची चार्जिंग स्टेशन्स वाढली; पुण्यात सर्वाधिक सुविधा केंद्र सुरु | पुढारी

महावितरणची चार्जिंग स्टेशन्स वाढली; पुण्यात सर्वाधिक सुविधा केंद्र सुरु

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढू लागल्याने या वाढत्या वाहनांना सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला. महावितरणने स्वत:ची तसेच खासगी अशी मिळून राज्यात 3 हजार 125 चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. राज्यात सात लाखांपेक्षा अधिक असलेल्या  इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करणे या स्टेशनमुळे वाहनचालकांना सोयीचे झाले आहे.
चार्जिंग स्टेशन्सची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात ती 1,900 असून, त्यापाठोपाठ मुंबईतही 415 चार्जिंग स्टेशन्स आहेत. त्यानंतर ठाणे, नागपूर, नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांतदेखील चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक ही सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. सन 2025 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर 25 टक्क्यांपर्यंत कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.  या वाहनांंना घरच्या घरी चार्जिंग करण्याची सुविधा आहे; मात्र दूर प्रवासात असताना बॅटरीचे चार्जिंग संपल्यास चार्जिंग करण्यासाठी महावितरण वीज कंपनीने चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास पुढाकार घेतला.
 राज्यात महावितरणची आणि खासगी अशी एकूण 3 हजार 125 चार्जिंग स्टेशन्स आहेत. पुढील काळात राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार आहे, ही बाब लक्षात घेत महावितरण आणखी चार्जिंग स्टेशन्स वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
    भारत पवार,  मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण

किफायतशीर प्रवास

पेट्रोलवर चालणार्‍या पारंपरिक दुचाकी वाहनाला इंधनाचा खर्च प्रतिकिलोमीटर सुमारे 2 रुपये 12 पैसे येतो, तर विद्युत दुचाकीला प्रतिकिलोमीटर 54 पैसे खर्च येतो. पेट्रोलवर चालणार्‍या चार चाकी वाहनाला प्रतिकिलोमीटर सुमारे 7 रुपये 57 पैसे खर्च येतो, तर विद्युत चार चाकीला प्रतिकिलोमीटर 1 रुपया 51 पैसे खर्च येतो.

हेही वाचा

Back to top button