भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा : इंग्रजांविरुद्ध जे प्रथम लढले ते आदिवासी बांधव आणि आदिवासी लढाऊ नेते देशाचे मूळ निवासी आहेत. ते वनवासी नाहीत. राज्यात सध्या आरक्षण वाद सुरू आहे. सर्व समाजाचे लोक आरक्षण मागत आहेत. आदिवासी समाजाला आरक्षण हे घटनेने दिले आहे. ते कोणालाही मिळणार नाही. जर चुकीचे झाले तर आदिवासी व धनगर समाजात वेगळी परिस्थिती निर्माण होईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
जांभोरी (ता. आंबेगाव) येथे आदिवासी समाज प्रबोधन व संयुक्त जयंती उत्सव कार्यक्रमात सहकारमंत्री वळसे पाटील बोलत होते. विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम, आदिवासी नेते सुभाष मोरमारे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, माजी जिल्हा परिषद सदस्य रूपाली जगदाळे, इंदुबाई लोकरे, डॉ. विलास गवारी, जांभोरी सरपंच संजय द. केंगले , सुनंदा पारधी, बबन किंगले, ग्रामपंचायत सदस्य शिवराम केंगले, दुंदा भोकटे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भीमाशंकर मंदिरावरून भांडणे करण्यापेक्षा एकत्रित बसून त्यातून मार्ग काढला जाईल. जांभोरी येथील लायन हार्टेड होनाजी केंगले स्मारकाचा आराखडा बनवून त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन सहकार मंत्री वळसे पाटील यांनी दिले. तर आदिवासी भागातील हिरड्याला 200 रुपये हमीभाव मिळावा. डिंभे धरण, आहुपे, तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पर्यटन व्यवसाय उभारावा, आदी मागण्या प्रवीण पारधी, हेमंत केंगले संजय केंगले, देवदत्त निकम यांनी केल्या.
हेही वाचा :