Pimpri: वायूगळती झाल्यास पालिकेची यंत्रणा सज्ज

Pimpri: वायूगळती झाल्यास पालिकेची यंत्रणा सज्ज
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: शहरातील औद्योगिक आस्थापनांनी सुरक्षेला प्राधान्य देऊन घातक रासायनिक पदार्थांची हाताळणी करताना किंवा वाहतूक करताना आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेची अग्निशमन विभागाची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे, असे महापालिकेचे आयुक्त प्रदीप जांभळे यांनी गुरुवारी (दि.11) सांगितले. महापालिकेच्या वतीने निगडी येथील सेक्टर 23 जलशुद्धीकरण केंद्र येथे क्लोरीन वायुगळती नियंत्रण या विषयावरील आपत्कालीन सराव (मॉक ड्रिल) करण्यात आला.

या वेळी ते बोलत होते. या सरावात महापालिका, एनडीआरएफ, पोलिस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा संचलनालय यांचा सहभाग होता. या वेळी सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, उपायुक्त मनोज लोणकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, एनडीआरएफचे सेकंड इन कमांडंट रविप्रकाश, दीपक तिवारी, सहाय्यक कमांडंट प्रवीण धट, पोलिस निरीक्षक अजयकुमार यादव, ईश्वरदास मते, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, प्रदूषण मंडळाचे अधिकारी सुनंदा जाधव, औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहाय्यक संचालक संजय गिरी, पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, दंगल नियंत्रण पथकाचे प्रमुख संदीप देशमुख आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये क्लोरीनचा वापर जलशुद्धीकरणासाठी केला जातो. याकरिता याठिकाणी क्लोरीनचे सिलिंडर ठेवलेले असतात. कोणत्याही ठिकाणी रासायनिक विषारी वायुगळती झाल्यास ती दुर्घटना कशा पद्धतीने हाताळावी यासाठी महापालिकेच्या पुढाकाराने जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात आपत्कालीन सराव घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत हाताळणार्‍या संलग्न यंत्रणांमध्ये समन्वय राहावा, यासाठी हा सराव उपयुक्त ठरणार आहे, असे आपत्कालीन विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले.या आपत्कालीन सरावामध्ये एनडीआरएफ दलाचे 51 जवान, महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाचे 29 जवान, पोलिस दलाचे 22 जवान, दंगल नियंत्रण पथकाचे 20 जवान, सुरक्षा विभागाचे 11 सुरक्षारक्षक तसेच वैद्यकीय विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

वायुगळतीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती गरजेचे

क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. हा हवेपेक्षा जड वायू असल्यामुळे शक्यतो तो जमिनीवरच पसरतो. ज्या भागात क्लोरीनचा वापर केला जातो त्या भागातील नागरिकांमध्ये वायुगळतीबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. वायुगळती होऊ नये, यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची वारंवार तपासणी करणे गरजेचे आहे. द्रव्य स्वरूपातील क्लोरीन हा आणखी घातक असून हवेच्या संपर्कात आल्यानंतर तो चारपटीने वाढतो. वायुगळती झाल्यास महापालिकेने शहरातील सर्व आपत्कालीन यंत्रणांसोबत समन्वय साधणे गरजेचे आहे. यासोबतच वायुगळतीबाबत नागरिकांमध्ये अफवाही पसरतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. प्रत्यक्ष ठिकाणी व अप्रत्यक्ष ठिकाणी वायुगळतीबाबत वेगवेगळा कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. तसेच साहित्य सुरक्षितता माहिती पत्रक बनविणे खूप गरजेचे आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रशासकीय किंवा औद्योगिक ठिकाणी वापरात येणार्‍या घातक रासायनिक घटकांची संपूर्ण माहिती नमूद असायला हवी, असे एनडीआरएफचे पोलिस निरीक्षक अजयकुमार यादव यांनी सांगितले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news