मर्जीविरुद्ध लग्न लावले म्हणत नवविवाहिता पोलिस आयुक्तालयात, थेट आत्महत्येचा इशारा | पुढारी

मर्जीविरुद्ध लग्न लावले म्हणत नवविवाहिता पोलिस आयुक्तालयात, थेट आत्महत्येचा इशारा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आई वडिलांनी माझ्या मर्जीविरुद्ध लग्न लावले, असे म्हणत तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुणीने 11 जानेवारीला संध्याकाळी साडेसात वाजता थेट पोलिस आयुक्तालय गाठले. या नवविवाहितेची भेट घेत दामिनी पथकाने तिचे समुपदेशन केले. त्यानंतर तिला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय पूजा (नाव काल्पनिक आहे) हिचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. लग्नपूर्वी तिची एका आंतरधर्मीय तरुणासोबत मैत्री होती. त्याच तरुणासोबत लग्न करण्याचा हट्ट तिने धरला होता, मात्र कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला. तसेच तिची समजूत घालून तिच्या मर्जीनुसार नात्यातील एका तरुणासोबत तिचा विवाह जुळविला. पूजाच्या मर्जीवरूनच नात्यातील या तरुणासोबत तीन महिन्यांपूर्वी तिचे लग्न लावण्यात आले.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता तिने अचानक पोलिस आयुक्तालय गाठले. तेथे उपस्थित अधिकार्‍यांना तिने मर्जीविरोधात लग्न लावल्याचे सांगितले. आत्महत्या करण्याचा ईशारा दिला. नियंत्रण कक्षाने तत्काळ ही माहिती दामिनी पथकाला दिली. उपनिरीक्षक कांचन मिरधे, अंमलदार सोनाली निकम, कल्पना खरात यांना कळविली. त्यांनी लगेचच पोलिस आयुक्तालयात धाव घेतली. नवविवाहितेची भेट घेत तिचे समुपदेशन केले.

त्यानंतर तिच्या वडील व काकांना संपर्क केला. रात्री घाबरलेल्या वडिलांनी आयुक्तालयात धाव घेतली. दामिनी पथकाने देखील पूजाचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर तिला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

Back to top button