कुटुंबीय दफनविधीला गेले अन् चोरट्यांनी घर फोडलं; पाच लाखांचा ऐवज लंपास | पुढारी

कुटुंबीय दफनविधीला गेले अन् चोरट्यांनी घर फोडलं; पाच लाखांचा ऐवज लंपास

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुटुंबीय वडिलांच्या दफनविधीसाठी गेल्यानंतर रात्रीतून चोरट्यांनी घर फोडले. 61 ग्रॅम सोन्याचे दागिने, 25 हजारांची चांदी आणि एक लाख 80 हजार रुपये रोकड, असा पाच लाख 15 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना वैशाली ढाबा, पिसादेवी रोड भागात 8 जानेवारीच्या रात्री घडली. या प्रकरणी 10 जानेवारी रोजी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.

सय्यद शकील सय्यद उमर (51, रा. वैशाली ढाबा, पिसादेवी रोड) हे फिर्यादी आहेत. ते पत्नी, मुलाबाळांसह राहतात. 8 जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता शकील यांचे वडील उमर सय्यद यांचे निधन झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर लगेचच घराला कुलूप लावून ते कुटुंबीयांसह एसटी कॉलनी, कटकट गेट भागात गेले. त्या रात्री वडिलांचा दफनविधी करून शकील हे कुटुंबीयांसह 9 जानेवारीला सकाळी 10 वाजता घरी परतले. तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले. लोखंडी कपाटाचे लॉकर तुटलेले दिसले.

चोरट्यांनी 14 ग्रॅमचा नेकलेस, 5 ग्रॅमचे पॅन्डल, 10 ग्रॅमचे कानातील वेल, 8 ग्रॅमचा नेकलेस, 10 ग्रॅमचा नेकलेस, 2 ग्रॅमची कर्णफुले, 2 ग्रॅमची कानातील रिंग, 2 ग्रॅमची बाळी, 14 हजारांचे पैंजन आणि एक लाख 80 हजार रुपये रोकड, असा 5 लाख 15 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले. त्यानंतर शकील यांनी सिडको ठाण्यात धाव घेत घरफोडीची फिर्याद दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पंकज मोरे करीत आहेत.

Back to top button