पिंपरी आग दुर्घटना : मृत्यूचे सापळे अजून किती?

पिंपरी आग दुर्घटना : मृत्यूचे सापळे अजून किती?

Published on
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मिळेल त्या जागी पत्राशेड उभारून आणि अनधिकृत बांधकाम करून लघुद्योग, फॅक्टरी, वर्कशॉप तसेच, भंगार गोदामे थाटली आहेत. तसेच, रेडझोन, नाले व नदी काठावर दाटीवाटीने अनधिकृत बांधकामे करून असंख्य उद्योग सुरू आहेत. अग्निशमन यंत्रणा आणि इतर सुरक्षा मापदंड पायदळी तुडवून, विनापरवाना हे उद्योग खुलेआम सुरू आहेत. त्यामुळे आगीसारख्या दुर्घटना घडून निष्पाप कामगार, नागरिक व रहिवाशांचा बळी जात आहे. महापालिका, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ती आमची जबाबदारी नाही, असे म्हणत हात वर करीत आहेत. मग, याला जबाबदार कोण, असे म्हणत शहरवासीयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
तळवडे रेड झोनमधील पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या कारखान्यामध्ये आग लागून 6 कामगारांचा मृत्यू झाला. तर, 10 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात किती धोकादायक भाग आहेत, हे स्पष्ट होत आहे. रेड झोन भागात बांधकाम तसेच, पत्राशेड उभारण्यास बंदी आहे. तो नियम फाट्यावर मारत तळवडे आणि आजूबाजूच्या परिसरात वर्कशॉप, लघुद्योग, भंगार गोदामे व इतर आस्थापना बिनदिक्कतपणे सुरू आहेत. तसेच, 4 ते 5 मजली इमारती बांधून सदनिका व गाळ्यांची विक्री खुलेआम सुरू आहे.
महापालिका तसेच, एमआयडीसीकडून कारवाई होत नसल्याने त्याला कोणताही प्रतिबंध नसल्याने या भागांत औद्योगिकरणासह लोकवस्ती वाढली आहे. दाटीवाटी चित्र निर्माण झाले आहे. असे करताना अग्निशमन यंत्रणा व साधनांच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात आहे. अपुर्‍या जागेतील पत्राशेडमध्ये हे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी कोणताही परवाना घेतलेला नसतो. अशा धोकादायक उद्योगात काम करणार्‍या हजारो कामगारांची सुरक्षा अक्षरश: टांगणीला लागलेली असते. छोटी आग लागली तरी, तत्काळ सुरक्षा यंत्रणा उपलब्ध न झाल्याने, तसेच, अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन बंबही वेळेत घटनास्थळी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे दुर्घटनेत मोठी वित्त व जीवित हानी होते. त्याच कारणांमुळे तळवडेच्या आजच्या घटनेत अनेक कामगारांचे नाहक बळी गेले.

तळवडे रेडझोनमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव

तळवडेसह रूपीनगर, चिखली, मोशी, दिघी, भोसरी, वडमुखवाडी, निगडी, यमुनानगर या रेड झोन परिसरात बांधकामांना प्रतिबंध आहे. मात्र, असे असूनही त्या भागांत अनधिकृत बांधकामे व पत्राशेड उभारून विक्री केली जात आहे. कमी दरात गाळा मिळत असल्याने त्यांची विक्री होत आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे. महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी या अनधिकृत बांधकामे व पत्राशेडवर प्रत्यक्ष कारवाई न करता नोटिसा बजावून 'अर्थपूर्ण' संबंध निर्माण करून अभय देत असल्याचे आरोप अनेकदा झाले आहेत. त्यामुळे रेड झोन भागात अनधिकृत बांधकामांचे अक्षरश: पेव फुटले आहे. त्यात महापालिकेने विविध कारणांसाठी आरक्षित केलेल्या जागाही गायब करण्यात आल्या आहेत.

अनधिकृत बांधकामांचा तारांकित प्रश्न

दिघी मॅगझिन आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीमुळे दिघी, भोसरी, मोशी, वडमुखवाडी, तळवडे, चिखली, निगडी, यमुनानगर या रेड झोन भागांत अनधिकृत बांधकामे मोठ्या संख्येने झाली आहेत. ती बांधकामे रोखण्यास महापालिकेस अपयश आले आहे. महापालिका कारवाई करीत नसल्याने अनधिकृत बांधकामे करून त्यांची विक्री सुरू आहे. असा तारांकित प्रश्न हिवाळी अधिवेशनात आमदार जानकर यांनी उपस्थित केला आहे.

पूर्णानगर घटनेनंतर सर्वेक्षण

पूर्णानगर येथील एका हार्डवेअरच्या दुकानास आग लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ऑगस्ट 2023 ला घडली. शहरात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये म्हणून अग्निशमन विभागातर्फे अशा व्यावसायिक गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. दुकाने, गोदाम, गॅरेज, बेकरी, हॉटेल, शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंप, औद्योगिक व वैद्यकीय आस्थापना, मल्टीप्लेक्स अशा 90 हजार व्यावसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणात तळवडेच्या त्या वर्कशॉपचेही तपासणी केली होती. परवाना नसलेल्या आस्थापनांवर महापालिका कारवाई करणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

वारंवार आगीच्या घटना

गेल्या महिन्यात निगडी येथील सेक्टर क्रमांक 22 दळवीनगर येथील भंगार गोदामास आग लागून तीन घरे व एक दुकान जळून भस्मसात झाले होते. गेल्या वर्षी आकुर्डीतील बिना स्कूलशेजारच्या वर्कशॉपला आग लागली होती. तातडीने दक्षता घेतल्याने शालेय विद्यार्थी बचावले होते. चिखली, कुदळवाडी परिसरात भंगार गोदामाना आग  लागण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.

90 हजार व्यावसायिक,  5 हजार औद्योगिक मिळकती

शहरात 90 हजार व्यावसायिक मिळकती आणि 5 हजार औद्योगिक मिळकती असल्याचा अंदाज आहे. त्या सर्व इमारती आणि आस्थापनांचे दर सहा महिन्यांनी 'फायर ऑडिट' तपासण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अग्निशमन विभाग करते. प्रत्यक्ष तपासणी न करता खासगी एजन्सीच्या अहवालावरून फायर एनओसी दिली जाते. त्यामुळे अग्निशमन यंत्रणा सक्षम व अद्ययावत नसल्याने शहरात आगीचा मोठ्या घटना वारंवार घडत आहेत. महापालिका व एमआयडीसी प्रशासनाच्या बेफिकरीमुळे आगीसाख्या दुर्घटनांचा धोका वाढला आहे.

पाच मजल्यापेक्षा उंच इमारतीसाठी फायर ऑडिट सक्तीचे

शहरातील पाच मजल्यापेक्षा अधिक उंचीच्या निवासी व व्यापारी इमारतींना फायर ऑडिट व एनओसी घेणे बंधनकारक आहे. फायर यंत्रणा सक्षम ठेवणेही गरजेचे आहे. त्यासाठी दर सहा महिन्यांनी एनओसीची नूतनीकरण करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिक किंवा हाऊसिंग सोसायट्यांची आहे. त्यामुळे आगीसारखी घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविणे सोपे जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते. दिखाऊ कारवाई करून प्रकरणाची फाईल बंद केली जाते, असा आतापर्यंतचा अनुभव आहे.

दर सहा महिन्यांनी नूतनीकरणाची अट

औद्योगिक, व्यापारी व निवासी आस्थापनांनी दर सहा महिन्यांनी फायर एनओसी व यंत्रणा योग्य असल्याबाबच्या दाखल्याचे नूतनीकरण करण्याचा नियम आहे. तसे न केल्यास त्या आस्थापनांवर कारवाईचा कोणताही नियम नाही. व्यापारी कारणांसाठी एनओसी लागत असल्यास संपूर्ण इमारतींचे फायर ऑडिट करण्याची सक्ती केली जाते. एनओसीला विलंब केल्यास शुल्कासह दंड आकारला जातो. शहरातील व्यापारी व निवासी इमारतींनी दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट करून घेऊन अग्निशमन विभागाचे एनओसी घेणे बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

अग्निशमनकडून आग आटोक्यात

तळवडे येथील एका कंपनीला शुक्रवार (दि. 8) दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, 10 ते 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृतांप्रती आयुक्त शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, आगीची वर्दी मिळताच महापालिकेचे 7 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तींचे शव यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आणले असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत आहेत.
जखमी झालेल्यांपैकी 8 व्यक्तींना वायसीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तात्काळ ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. तर 2 व्यक्तींना ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खासदार श्रीरंग बारणे, पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी 'वायसीएम'मध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. याठिकाणी महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, पोलिस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, अग्निशमनचे उपायुक्त मनोज लोणकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, पोलिस उपायुक्त विवेक पाटील, डॉ. शिवाजी पवार, डॉ. काकासाहेब डोळे, तहसीलदार अर्चना निकम आदी उपस्थित होते.
वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील, डॉ. अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमींविषयी माहितीसाठी डॉ. विनायक पाटील (9822000413) आणि आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल (7276771077) यांचेशी संपर्क साधावा, असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बर्न वॉर्डअभावी हेळसांड

महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयांत जळीत रुग्णांसाठी बर्न वॉर्ड नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचे शुक्रवारी (दि. 8) तळवडे येथील आगीच्या घटनेनंतर स्पष्ट झाले. या घटनेत जखमी झालेल्या 8 रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे बर्न वॉर्डची सुविधा नसल्याने प्राथमिक उपचार करुन त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामध्ये 7 महिला आणि 1 पुरुष रुग्ण होता. त्यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक होती.

थेरगाव रुग्णालयात  बर्न वॉर्डचे नियोजन

पालिकेच्या वतीने नवीन थेरगाव रुग्णालयात जळित रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड करण्याचे नियोजन होते. मात्र, याबाबत कार्यवाही होऊ शकली नाही. वायसीएममध्ये व पालिकेच्या अन्य रुग्णालयांत सध्या बर्न वॉर्ड नाही. त्यामुळे जळित रुग्णांना ससून रुग्णालयात पाठविण्याशिवाय पालिकेकडे दुसरा पर्याय नाही. वेळप्रसंगी अशा रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयातील उपचार घेणे परवडणारे नसते. जळीत रुग्णांना वेळीच उपचार मिळू न शकल्यास त्यांचा मृत्यू होण्याचाही धोका असतो. त्यामुळे त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका प्रशासनाने बर्न वॉर्डची सोय करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
आगीच्या घटनेची माहिती अग्निशामक केद्रांत दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी कळविण्यात आली. घटना घडली त्याच परिसरात अग्निशामक केंद्र असल्यामुळे दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर इतर ठिकाणच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर कारखान्यात अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली. या घटनेत महिला जास्त प्रमाणात भाजल्या होत्या. ज्या महिलांना किरकोळ दुखापत झाली होती, त्यांना रुग्णवाहिकेची वाट न पाहता टेम्पोतून वायसीएम रुग्णालयात ताबडतोब पाठविले. काही वेळाने घटनास्थळी सात रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या.
– शाहू व्हनमाने, फायरमन
वायसीएमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांपैकी 6 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. हा कारखाना रेडझोन क्षेत्रात आहे. कंपनी आणि जागा मालकाविरोधात पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
– डॉ. शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
तळवडेतील कंपनीला लागलेली आग ही दुर्दैवी घटना आहे. रेडझोनच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे लष्कर या हद्दीतील युनिटला वगळण्यासाठी सरकारकडे एनओसी देणार नाही. फॅब्रिकेशनच्या नावाखाली फायर कॅण्डल बनविण्याचा उद्योग करणे योग्य नाही. या भागातील उद्योजकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
– गोविंद पानसरे,  अध्यक्ष पिंपरी-चिंचवड इंडस्ट्रीज फेडरेशन
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news