

पिंपरी: शहरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे जड वाहनांची वर्दळ, काँक्रीट मिक्सरची ये-जा आणि राडारोड्याच्या वाहतुकीचा ताण रस्त्यांवर वाढत आहे. त्यातच काही बांधकामस्थळांलगत सार्वजनिक रस्त्यांवर 'नो पार्किंग'चे फलक आणि लावले जात आहेत. त्यामळे ऐन वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
बांधकामाच्या कामासाठी सार्वजनिक रहदारीची जागा वापरली जात असल्याचे शहरात दिसून येत आहे. सार्वजनिक जागा वापरण्यापूर्वी आवश्यक परवानगी आणि वाहतूक व्यवस्थेचे नियम पाळले जात आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा फलकांची अधिकृतता तपासून सार्वजनिक रस्त्यांचा वापर नियमांनुसार होतोे की नाही, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
बांधकामांचा वाढता व्याप, रस्त्यांवर अतिरिक्त भार पिंपरी-चिंचवड शहरात विविध भागांत गृहप्रकल्प आणि व्यावसायिक इमारतींची कामे वेगात सुरू आहेत. या कामांसाठी बांधकाम साहित्याची वाहतूक करणारी अवजड वाहने, रेडीमिक्स काँक्रीटचे मिक्सर आणि राडारोडा वाहून नेणारे डंपर यांची सतत ये-जा सुरू असते. काही ठिकाणी या वाहनांमुळे वाहतुकीवर ताण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातच बांधकामस्थळांसमोरील रस्त्यांवर नो पार्किंगचे फलक किंवा फ्लॅग बॉक्स लावले जात असल्याने त्या भागातील वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी उद्भवते.
फलक अधिकृत आहेत का?बांधकामाच्या कामासाठी काही वेळेस वाहनांची उभी करण्याची व्यवस्था, साहित्य उतरविण्यासाठी जागा किंवा तात्पुरत्या वाहतूक नियंत्रणाची आवश्यकता असू शकते. मात्र, यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बांधकाम स्थळांलगत लावण्यात आलेले नो पार्किंगचे फलक अधिकृत परवानगीने लावले आहेत का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
वाहतूक व्यवस्थेवर परिणाम
शहराचा विकास होत असताना बांधकाम व्यावसायिकांना आवश्यक सुविधा मिळणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक उपलब्ध होणेही आवश्यक आहे. त्यामुळे बांधकामासाठी रस्त्याचा वापर करताना नियमांचे पालन केले जात आहे का, याची संबंधित विभागांनी देखरेख करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.