

पिंपरखेड: घोड नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने पिंपरखेड-देवगाव हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली जाऊन बंधाऱ्याचे लोखंडी संरक्षक कठडे तुटून पडले आहेत. पाण्याच्या प्रवाहाने बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अडकलेल्या जलपर्णी देवगाव हा ग्रामस्थांनी बाजूला करून येथील वाहतूक सुरळीत केली. परंतु, सद्य:स्थितीत या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे.
रविवारी (दि. 28) घोड नदीला आलेल्या मोठ्या पुराने पिंपरखेड-देवगाव यादरम्यान घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला होता. तब्बल 45 हजार क्युसेक पाण्याचा मोठ्या निसर्गामुळे नदीने रौद्ररूप धारण केले होते. पिंपरखेड-देवगाव बंधाऱ्यावरील प्रवास धोकादायक; पुराने संरक्षक कठडे तुटले. (Latest Pune News)
नदीच्या प्रचंड पुरामध्ये अनेक प्रकारच्या जलपर्णी, झाडे वाहून आल्याने दोन्ही बाजूंचे लोखंडी संरक्षक कठडे तुटून त्यातील काही वाहून गेले. पुराचे पाणी ओसरल्यावर बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर जलपर्णी अडकल्याने पायी प्रवास करणे मुश्कील झाले होते.
देवगाव येथील शालेय विद्यार्थी व नागरिकांना पिंपरखेड येथे जाण्यासाठी या बंधाऱ्यावरील पुलाचा वापर करावा लागत असल्याने देवगाव येथील संजय खांडगे, गोविंद बबन खांडगे, दत्तात्रय शिवराम दाभाडे, सुधाकर खांडगे, संतोष खळे, श्रीकांत दळवी, स्वप्निल पवार, यश गावडे यांनी दोन तास परिश्रम घेऊन बंधाऱ्यावरील अडकलेली सर्व जलपर्णी काढून वाहतूक सुरू केली.
पुलाची त्वरित दुरुस्ती करावी
शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना येथून दैनंदिन प्रवास करावा लागत असून, संरक्षक कठडे तुटल्याने सध्या धोकादायक प्रवास सुरू आहे. पाटबंधारे विभागाने नवीन संरक्षक कठडे बसवून झालेल्या नुकसानीची तत्काळ दुरुस्ती करून प्रवास सुखकर करावा, अशी मागणी पिंपरखेड तसेच देवगाव ग्रामस्थांनी केली आहे.