

भोर: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव हद्दीत रस्त्यावरील मोरी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पडली. या अपघातात एकाचा मृत्यू, तर दुसरा जखमी झाला. हा अपघात (दि. 29) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
राहुल विश्वास पानसरे (वय 45, रा. घाटकोपर, मुंबई) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर राहुल देवराम मुटकुले (वय 32) हा जखमी झाला. (Latest Pune News)
पानसरे व मुटकुले हे दोघे कारमधून (एमएच 12 एचझेड 9299) भोरहून महाडमार्गे गणपती पुळेला जात होते. शिरगाव हद्दीत पाऊस व धुके असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने रुंदीकरणात मोरी टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पडली. यामध्ये पानसरेचा मृत्यू झाला, तर मुटकुले हा जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच भोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पोलिस हवालदार गणेश लडकत, सुनील चव्हाण, अजय साळुंके, ज्ञानेश्वर शेडगे हे घटनास्थळी दाखल झाले. दोघांना बाहेर काढले.
मृत पानसरेचा मृतदेह भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, तर जखमी मुटकुलेला महाड (जि. रायगड) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिस पाटील शंकर पारठे, वक्रतुंड क्रेन सर्व्हिसचे अक्षय धुमाळ व स्थानिकांनी अपघातस्थळी पोलिसांना मदत केली. भोर पोलिस पुढील तपास करीत आहेत.