

पिंपरखेड: शिरूर तालुक्यातील फाकटे ते कवठे येमाई या दोन गावांदरम्यानच्या घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या फत्तेश्वर बंधाऱ्याचे दोन खांब ढासळले आहेत. यामुळे प्रशासनाकडून बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
घोड नदीला रविवारी (दि. 28) महापूर आला होता. या पुराच्या पाण्याने फाकटे ते कवठे येमाई येथील फत्तेश्वर बंधाऱ्याला पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. बंधाऱ्याचा एक दगडी बांधकाम असलेला खांब पूर्णपणे वाहून गेला आहे, तर एक ढासळला आहे. (Latest Pune News)
दोन्ही खांब 15 फुटांच्या अंतरावर होते. याबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली. पाटबंधारे विभाग, महसूल व पोलिस प्रशासनाला माहिती दिली.पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
नदीच्या पुराचे पाणी कमी झाले असले, तरी नदी अजून दुथडी भरून वाहत आहे. या बंधाऱ्याची यापूर्वीच मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आणखी खांब ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, येथे दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पूल वाहतुकीस बंद केला आहे.