गृहप्रकल्पांच्या जाहिरातीवर मेट्रोचे छायाचित्र

गृहप्रकल्पांच्या जाहिरातीवर मेट्रोचे छायाचित्र

[author title="मिलिंद कांबळे " image="http://"][/author]

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी ते निगडी या मार्गावरील अर्ध्या टप्प्यात मेट्रो धावत आहे. लवकरच निगडीपर्यंत मेट्रो धावेल. शहरात प्रथमच मेट्रो धावत असल्याने त्याची जाहिरात आपल्या व्यवसायासाठी बांधकाम व्यावसायिक मोठ्या प्रमाणात करत आहेत. या मार्गावरील तसेच, परिसरात असलेल्या मोठ्या गृहप्रकल्पांच्या जाहिरातींवर हमखास मेट्रोचे छायाचित्र वापरून ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रतिसादही मिळत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर टोलजंग इमारती

शहरात दापोडी येथील हॅरिस पूल ते मोरवाडी चौक, पिंपरी अशी मेट्रो धावत आहे. तेथून पुढे निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे काम लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे. या मार्गावरील कंपन्या, उद्योग व जुन्या इमारती पाडून नव्याने गृहप्रकल्प व व्यापारी संकुलासाठी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. इंडियन कार्ड क्लोदिंग, गरवारे नायलॉन्स, कॉटन ग्रीव्हज, महिंद्रा, दाय-इची कारकारिया लिमिटेड यासह असंख्य कंपन्या व उद्योग बंद पडले. त्या जागेवर नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम सुरू केले आहे.

दापोडी ते निगडी मार्गाचा चेहरामोहरा बदलतोय

दापोडी ते निगडी या 12.50 किलोमीटर अंतराच्या मार्गावरील कंपन्या आणि उद्योग बंद केल्या जात आहेत. त्या मोठ्या जागेत गृहप्रकल्प व व्यापारी संकुलासाठी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. तसेच, जुन्या इमारती व बैठी घरी पाडून पुनर्निर्माण केले जात आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे दापोडी ते निगडी या मार्गाच्या दोन्ही बाजूने चेहरामोहरा बदलत आहे. देशातील अनेक नामवंत दालने व शॉपिंग मॉल या मार्गावर सुरू आहेत.

महापालिकेच्या वतीने या मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार सुशोभीकरण केले जाणार आहे. चिंचवड येथील डी मार्टशेजारी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 18 मजली इमारत बांधली जात आहे. तसेच, तेथील खाणीच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे तब्बल 40 मजली सिटी सेंटर उभे करण्याचे नियोजन आहे. या सर्व बदलामुळे भविष्यात हा भाग शहरातील महत्त्वाचा आणि आकर्षणाचा केंद्र असणार आहे.

मेट्रोमुळे नागरिकांचा सुरक्षित प्रवास

निगडीपासून स्वारगेटपर्यंत मेट्रो धावणार आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्या मार्गावर मेट्रोची सुविधा झाली आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत काम सुरू झाले आहे. त्यामुळे साहजिकच त्या मार्गावर किंवा आजूबाजूला गृहप्रकल्पाचे बांधकाम होत असतील तर, ते मेट्रोची कनेक्टिव्हीटी असल्याची जाहिरात करतात. त्याला महामेट्रो रोखू शकत नाही. मेट्रोमुळे नागरिकांना सुलभ व सुरक्षित प्रवास सेवा उपलब्ध होत आहे. दिवसेंदिवस मेट्रो प्रवासाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद

शहराचा हा मध्यवर्ती मार्ग असून, येथून पुणे व मुंबई या दोन्ही बाजूस वेगवान कनेक्टिव्हीटी आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या संख्येने प्रकल्प उभे करण्याची अक्षरश: स्पर्धा लागली आहे. या 61 मीटर रुंदीच्या प्रशस्त ग्रेडसेरपेटर मार्गाच्या दोन्ही बाजूस अनेक मोठे गृहप्रकल्प व व्यापारी संकुल उभे राहत आहेत. दापोडी, कुंदननगर, कासारवाडी, शंकरवाडी, पिंपळे गुरव, वल्लभनगर, एचए कंपनी, पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौक, मोरवाडी चौक, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण या भागात अनेक प्रकल्पांचे बांधकामे सुरू आहेत. तेथील सदनिका व गाळ्यांना प्रतिसाद मिळावा म्हणून मेट्रो मार्गाजवळ प्रकल्प अशी जाहिरात केली जात आहे.

त्यासाठी मेट्रोचे मोठ-मोठे छायाचित्र ठळकपणे वापरले जात आहेत. जाहिरात होर्डिंग, वृत्तपत्र, टीव्ही तसेच, सोशल मीडियावरील जाहिरातीसाठी मेट्रोचे छायाचित्र आवर्जून वापरले जात आहे. पिंपरी-चिंचवडसह पुणे शहराशी मेट्रो जोडले गेले आहे. त्यामुळे प्रवास करणे सुलभ व सुरक्षित असल्याने सदनिका व गाळ्यांना प्रतिसादही मिळत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो मार्ग (किलोमीटरमध्ये)

पिंपरी ते दापोडी : 7.90

विस्तारीत मार्ग
पिंपरी ते निगडी : 4.41

नियोजित मार्ग – इंद्रायणीनगर, भोसरी ते चाकण : 16.11

नियोजित मार्ग – पिंपरी-चिंचवडचा रिंगरोड : 31.40

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news