नवनाथ महाराज काळे यांना अखेरचा निरोप

नवनाथ महाराज काळे यांना अखेरचा निरोप

दहिगावने : पुढारी वृत्तसेवा : आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा। राम कृष्ण हरी मुखी बोला, या रामनामाच्या घोषात, संत-महंत व जनसमुदायांच्या उपस्थितीत नवनाथ महाराज काळे यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. 30) शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे उत्तराधिकारी सुदाम महाराज आदमने यांच्या हस्ते मंत्राग्नी देऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील दध्नेश्वर शिवालयाचे संस्थापक कृष्णदेव महाराज काळे यांचे उत्तराधिकारी गुरुदास नवनाथ महाराज काळे यांचे मंगळवारी (दि.28) रात्री वृंदावन (उत्तर प्रदेश) येथे निधन झाले.

त्यांचा अंत्यसंस्कार गुरुवारी भास्करगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. दध्नेश्वर शिवालयाच्या प्रांगणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यापुढे शिवालयाची जबाबदारी कृष्णदेव बाबा भक्त परिवार, भास्करगिरीजी महाराज, घुले बंधूंच्या सूचनेनुसार तसेच गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत यांच्या अनुमतीने विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सुदाम महाराज आदमने यांच्याकडे सोपवण्यात आली. ही जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडण्याची ग्वाही त्यांनी दिली.

देविदास महाराज म्हस्के, नरसिंग महाराज मुकुटकर, पद्माकर महाराज पाटोळे, ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष डॉ नरेंद्र घुले, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी सभापती डॉ क्षितिज घुले यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, भाविक हजारोंच्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. नंतर पसायदान महाप्रसाद वाटप करण्यात आले. चौदाव्यापर्यंत काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिजागर होणार असून गुरुवारी (दि.6 जून) दहाव्या दिवशी वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांचे व सोमवारी (दि.10 जून) चौदाव्या दिवशी भास्करगिरी महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news