

कुरकुंभ: कुरकुंभ-दौंड रस्त्यावर एसटी बससह पाच वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एसटीबस, मालवाहतूक टेम्पो आणि तीन कारचा समावेश आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही; मात्र, एक महिला जखमी झाली. रविवारी (दि. ८) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तारकपूर-अहिल्यानगर-सांगली एसटी बस दौंड हद्दीतील कुरकुंभ-दौंड रस्त्यावरून कुरकुंभच्या दिशेने सांगलीकडे जाण्यासाठी निघाली होती. याच एसटीबसच्या मागे चारही वाहने देखील कुरकुंभच्या दिशेने निघाले होते. वरील रस्त्यावर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात येथील म्हसोबा मंदिरासमोर एसटीबस अचानक थांबल्याचे सांगण्यात आले. (Latest Pune News)
यादरम्यान एसटीबसच्या मागे असलेले एक (छोटा) मालवाहतूक टेम्पो एसटीबसला धडकला. या टेम्पोला पाठीमागून एकापाठोपाठ एक असे तीन कारची धडक झाल्याने एकूण पाच वाहनाचा अपघात झाला.
अपघातात एका कारमधील एक वयोवृध्द महिलेच्या डोक्याला मार लागला असून त्यांना उपचारासाठी दौंड येथील खासगी रूग्णलयात दाखल केले होते. अपघातात पाच वाहनातील इतर प्रवाशी सुखरूप असून या सर्व वाहनांचे नुकसान झाले आहे. यावेळी रस्त्यावर काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती.
चालकाकडून वाहतूक नियमांची पायमल्ली
वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे वाहनचालकांनी पालन करणे गरजेचे असते. या नियमांमुळे अपघात टाळता येऊ शकतात. मात्र, याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. असाच प्रकार वरील अपघातात झाला आहे. दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याचा विसर वाहनचालकांना पडला का ? असे या अपघातातून चित्र दिसून येत आहे.