

बाणेर: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुतारवाडी- पाषाण राष्ट्रीय महामार्गालगत आरएमसी प्लांट उभा करण्यात येत आहे. पाषाण तलावालगत असलेल्या पक्षी अभयारण्य तसेच या भागातील रहिवाशांना या काँक्रीट रेडी मिक्स प्लांटमुळे त्रास होणार असून या प्लांट उभारणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मयूर सुतार व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. (Latest Pune News)
सदर आरएमसी प्लांटची कार्यपद्धती पाहता या ठिकाणी आजूबाजूला असलेल्या नागरी वस्तीला लेक व्हु सोसायटी, सिद्धटेक सोसायटी, शिवनगर, मुक्ता रेसिडेन्सी आदींना धुलीकण, सिमेंट कण याचा मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी व वन्य प्राणी आहेत, तसेच या प्लांटमुळे जैवविविधतेला देखील हानी पोहोचणार आहे. हजारो नागरिक पाषाण
तलाव परिसरामध्ये सकाळ- संध्याकाळी फिरण्यासाठी व पक्षी निरीक्षणासाठी येत असतात. पाषाण तलावालगतच काँक्रीट प्लांट उभारण्यात येत असल्याने याचा त्रास येथे येणाऱ्या नागरिकांना देखील सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नागरी वस्तीमध्ये व अभयारण्यालगत पुणे महानगरपालिका पर्यावरण विभागाने व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लांट उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे.
आरएमसी प्लांट हा नागरी वस्तीपासून दूर असावा. तसेच, या ठिकाणी शेजारीच पक्षांसाठी आरक्षित असे अभयारण्य आहे. या ठिकाणी दूर-दूरवरून वेगवेगळे पक्षी येतात, त्यांच्या सुद्धा जीवनमानावर याचा परिणाम होऊ शकतो. या परिसरातील जैवविविधता धोक्यात येणार असून पाषाण तलावातील प्रदूषण देखील वाढणार आहे. त्यामुळे येथे उभारण्यात येणारे प्लांटचे काम बंद करावे. अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुतारवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
मयूर सुतार, पदाधिकारी, मनसे
प्लांट नागरिकांवर लादू नये
पुणे शहरात व वस्त्यांलगत असलेले अनेक आरएमसी प्लांट आरोग्याला अपायकारक असल्याने बंद करण्यात आले आहेत. त्यातच या ठिकाणी हा प्लांट उभारण्याचा घाट का घातला जात आहे. यामध्ये दिल्ली व वरिष्ठ पातळीवरील नावे घेतली जात असल्याने नेमका हा प्लांट सुरू करण्याचा प्रयत्न कोण करत आहे, हे लक्षात येत नाही. पर्यावरणाची हानी करणारा व आरोग्याला हानिकारक असलेला हा प्लांट नागरिकांवर लादण्यात येऊ नये.
अद्याप परवानग्या मिळाल्या नसून परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून सांगतो किंवा त्यांचा नंबर पाठवतो.
मोहन दुबे, अधिकारी, रेडी मिक्स प्लांट