देहूगाव(पुणे) : देहूगावमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने इंद्रायणी पुलावर भाविकांच्या वाहनांचे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे शहरात वाहतूककोंडी होत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
यावर्षी चार वर्षांनंतर अधिक महिना आला आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून दररोज हजारो वारकरी-भाविक देहूत दर्शनासाठी येत आहेत. परंतु, वाहनतळाची व्यवस्था नसल्याने यात्रेकरूंच्या वाहन पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच वैकुंठस्थान मंदिर ते चौदा टाळकरी कमानीदरम्यान पीएमपीचा बसस्टॉप आहे.
या याच ठिकाणी अधिक महिन्यानिमित्त संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. त्यातच जवळच वैकुंठस्थान मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी पादचारी वारकरी, भाविक-भक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा वर्दळीत पीएमपीच्या बसेस आडव्या तिडव्या वळविल्या जात आहेत. पीएमपीचा बसस्टॉपदेखील फूटपाथवर करण्यात आला आहे, त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
अधिक महिन्यानिमित्त देहूत दर्शनासाठी येणार्या यात्रेकरूंचा विचार करून पीएमपी्र्र-च्या बसेसची एकेरी वाहतूक सुरू करावी, विठ्ठलनगर तळवडे हॉस्पिटल चौकामधून येलवाडी फाटा बाह्यवळण मार्गे गाथा मंदिर ते वैकुंठस्थान मंदिर मार्गे या बसेसची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
देहूगावमध्ये असलेला ब्रिटिशकालीन पुलाची मुदत कालबाह्य झाल्याने या पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु, देहूगावात वाहनतळाची व्यवस्था नसल्याने येणारे भाविक नवीन पुलावर आपली वाहने पार्किंग करीत आहेत. परिणामी पुलावरील रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वारंवार वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे देहूगावमध्ये वाहनतळ असणे खूप गरजेचे झाले आहे. परंतु, या समस्येकडे स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा