

पारगाव : आंबेगाव तालुक्यात आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात कैऱ्या लगडल्याने बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. साधारणपणे उशिरा दिसणाऱ्या कैऱ्या यंदा लवकर आल्याने आंब्याची चव नागरिकांना नेहमीपेक्षा आधी चाखायला मिळणार आहे.
तालुक्यातील रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे, पारगाव आदी गावांमध्ये आंबाबागांमध्ये झाडांना कैऱ्या लगडल्याचे दिसत आहे. यंदा लवकरच जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच कैऱ्या दिसू लागल्या आहेत. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सध्या ढगाळ हवामान होत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आंबापिकासाठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे. सतत ढगाळ वातावरण राहिल्यास किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. यातून कैऱ्या गळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. विशेषतः मोहोर आल्यानंतरच्या टप्प्यात हवामानातील अस्थिरता आंब्याच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. काही शेतकऱ्यांनी योग्य औषध फवारणी, बागांची स्वच्छता आणि निगा राखण्यावर भर दिला आहे. तसेच संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्याचेही दिसून येते.
एकीकडे ढगाळ हवामानाची चिंता असली, तरी दुसरीकडे आताच कैऱ्या आल्याने यंदा बाजारात आंब्याची आवक लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग््रााहकांना आंब्याची चव नेहमीपेक्षा लवकर चाखायला मिळणार आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सध्या तरी बागांमध्ये हिरव्यागार कैऱ्यांनी आशादायक चित्र निर्माण केले आहे.