
Parents sell daughter for money
पुणे: चाळीस दिवसांच्या पोटच्या मुलीला आई-वडिलांनी पैशांसाठी साडेतीन लाख रुपयांत एजंटमार्फत एका महिलेला विकल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात समोर आला आहे. व्यवहारात एजंट लोकांनी जास्त पैसे घेतल्याचा संशय मुलीच्या आई-वडिलांना आला. त्यांनी पोलिस ठाण्यात आमच्या मुलीला कोणीतरी घेऊन गेल्याचे सांगितले. त्या वेळी पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी बाल न्याय अधिनियमासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून, या मुलीला विकत घेणारी महिला, बालिकेच्या आई-वडिलांसह मध्यस्थ (एजंट) अशा 6 जणांना अटक केली आहे. याबाबत पोलिस हवालदार सचिन गवळी यांनी फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
मीनल ओंकार सपकाळ (वय 30, रा. बिबवेवाडी) ओकांर औदुंबर सपकाळ (वय 29, रा. बिबवेवाडी), साहिल अफजल बागवान (वय 27, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय 34, रा. येरवडा), सचिन रामा अवताडे (वय 44, रा. येरवडा), दीपाली विकास फटांगरे (वय 32, रा. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार 2 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनल सपकाळ यांना 26 मे 2025 रोजी एक मुलगी झाली.ओंकार आणि साहिल हे दोघे मित्र आहेत. त्यांनी एजंट रेश्मा पानसरे हिच्या माध्यमातून मुलीला कोणाला तरी विकण्याचे ठरविले. रेश्मा ही शहरातील रुग्णालयामध्ये जाऊन मूलबाळ नसलेल्या महिलांशी जाणीवपूर्वक संपर्क वाढवित असल्याची साहिल याला माहिती होती.
रेश्माच्या माध्यमातून ओंकार, मिनल आणि साहिल यांनी साडेतीन लाख रुपयांत मुलीचा सौदा दिपाली फाटांगरे हिच्यासोबत केला. 2 जून रोजी साहिल याने सपकाळ यांच्या घरातून सकाळी 9 वाजता मुलीला त्यांच्या संमतीने विक्री करण्यासाठी स्वतःच्या ताब्यात घेऊन रेश्मा हिच्या शास्त्रीनगर येरवडा येथील घरी सकाळी अकरा वाजता आला. तेथे रेश्मा आणि दिपाली या दोघींकडून ठरल्याप्रमाणे रोख आणि ऑनलाइन असे पूर्ण पैसे घेतले. त्यानंतर दिपाली ही मुलीला घेऊन संगमनेर येथे गेली होती.
...असा आला प्रकार उजेडात
दरम्यान, मुलीला साडेतीन लाख रुपयांत विक्री करण्यात आल्यानंतर सपकाळ दाम्पत्याला दोन लाख रुपये मिळाले होते. त्यातील एक लाख रुपये साहिल याने घेतले. तर पन्नास हजार रुपये रेश्मा आणि तिच्या पतीला मिळाले. पैशावरून सपकाळ दाम्पत्य आणि रेश्मा पानसरे यांच्यात वाद झाला. याबाबत रेश्मा हिच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी मिनल सपकाळ बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गेल्या.
परंतु हा प्रकार येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी ही माहिती येरवडा पोलिसांना दिली. सुरुवातीला आमची मुलगी पळवून नेली, असे सपकाळ दाम्पत्याने सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मध्यस्थ व मुलीला विकत घेणार्या दिपाली फटांगरे यांना पकडून आणले.
त्यांची पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने चौकशी केली. तेव्हा वेगळाच प्रकार समोर आला. या बालिकेला पळवून नेली नसून, तिच्या आई-वडिलांनीच तिला विकल्याचे वास्तव समोर आले. दिपाली फटांगरे हिला कोणतेही कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया पार न पाडता साडेतीन लाख रुपयांच्या मोबदल्यात सपकाळ त्यांची बालिका विकून संगनमत व सहाय्य करून मानवी अपव्यापाराचा अपराध केला असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सुरुवातीला मुलीचे आई-वडील मुलीला पळवून नेले अशी तक्रार घेऊन आले होते. चौकशीमध्ये त्यांनीच मुलीला बेकायदेशीरपणे विकल्याचे समोर आल्यावर पोलिस फिर्यादी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
- रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक येरवडा