Panshet dam water level update
खडकवासला: रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील पानशेत-वरसगाव धरणक्षेत्रातील पावसाचा जोर मंगळवारी सकाळपासून ओसरला. धरणसाठ्यातील वाढ मंदावल्याने खडकवासला धरणाचा विसर्ग दुपारी दोन वाजता 17 हजार 974 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. सायंकाळी पाच वाजता धरणसाखळीत 25 .87 टीएमसी म्हणजे 88 .76 टक्के इतका पाणीसाठा झाला होता.
मुठा नदीची पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खडकवासलासह पानशेत आणि वरसगावची पाणीपातळी कमी करण्यात आली आहे. खडकवासला, पानशेत, टेमघर धरणमाथ्यावर रिमझिम पाऊस सुरू आहे. (Latest Pune News)
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, धरणक्षेत्रात सोमवारपेक्षा (दि. 29) मंगळवारी पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासलासह पानशेत व वरसगाव धरणांचा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा जादा पाणी मुठा नदीत सोडण्यात येणार आहे.
पानशेत-वरसगाव धरणखोर्यासह रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर रविवारी (दि. 26) रात्री मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी सातपासून मंगळवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 28 हजार 662 क्युसेकने विसर्ग सुरू होता. सोमवारी सायंकाळी धरणसाखळीत 26.56 टीएमसी पाणी होते. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणांतील जवळपास पाऊण टीएमसी पाणी गेल्या 24 तासांत कमी करण्यात आले आहे.
वरसगाव धरणातून सध्या 5711, पानशेतमधून 6288 आणि टेमघरमधून 280 क्युसेक पाणी खडकवासलात सोडले जात आहे. मंगळवारी टेमघर येथे 18, वरसगाव येथे 8, पानशेत येथे 8, तर खडकवासला येथे 2 मिलिमीटर पाऊस पडला.
सायरन बंद पडल्याने धावपळ
खडकवासला धरणातून मुठा नदीत जादा पाणी सोडण्यापूर्वी सायरन (भोंगा) वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला जातो. त्यामुळे नागरिकांसह महापालिका आणि पोलिस प्रशासन सतर्क होते. मात्र, सोमवारी 28 हजार क्युसेकपेक्षा जादा पाणी नदीपात्रात सोडताना धरणावरील सायरन बंद होते. त्यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्यांची तारांबळ उडली तसेच मंगळवारी देखील हे सायरन बंदच होते.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
मंगळवारचा पाणीसाठा
25.87 टीएमसी (88.76 टक्के)