

पुणे: खराडीतील स्टेबर्ड अझुर सुट्स या हॉटेलमध्ये रविवारी पहाटे उघडकीस आलेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. मात्र, त्यांच्याकडे दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर देखील पार्टीत कोकेनसद़ृश्य अमली पदार्थ, गांजा कोठून आला? त्याचा पुरवठा कोणी केला, याचा शोध पोलिसांना घेता आलेला नाही.
रविवारी पहाटे पावणे चार वाजता खराडी भागातील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्यासह निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव व दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. या रूममधून पोलिसांना 2 ग्रॅम 7 मिलीग्रॅम एवढा कोकेन सदृश्य पदार्थ, 70 ग्रॅम गांजा, हुक्का सेट, मद्याच्या बाटल्या सापडल्या. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक करून तपास सुरू केला. (Latest Pune News)
सर्व आरोपींची दोन दिवस कोठडी घेण्यात आली. या दोन दिवसांत त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे कोकेन सद़ृश्य पदार्थ, गांजा कुठून आला, त्यांना हे अमली पदार्थ पुरवणारा कोण, याची माहिती मिळविण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. दरम्यान, अटकेतील सर्वांच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ झाल्याने आता अमली पदार्थ पुरवठादार कोण, याचा माग काढणे पोलिसांसमोरचे आव्हान आहे.
अहवाल प्रलंबित
सर्व आरोपींची वैद्यकीय चाचणी केली असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्यामधील नेमके कोणी, अमली पदार्थ सेवन केले होते, हे स्पष्ट नाही. न्यायवैद्यक प्रयोग शाळेत आरोपींच्या रक्त आणि लघवीचे नमुने पाठविले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अमली पदार्थ सेवनाबाबतचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले