

Pune rave party investigation update
पुणे: खराडीतील हॉटेल स्टेबर्डमधील अमली पदार्थांच्या पार्टीपूर्वी एप्रिल व मे महिन्यात देखील हाऊस पार्टी केली होती. सद्यःस्थितीत आरोपींकडून जप्त केलेल्या मोबाईलमधून अनेक महिलांशी चॅटिंग तसेच पार्टीचे फोटो व व्हिडीओ मिळाले आहेत. आरोपींचे एकूण 10 मोबाईल जप्त केले आहेत. त्याबाबत सायबर तज्ज्ञांकडून तपास करायचा असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी (दि. 29) न्यायालयाला दिली. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या पार्टीत कोण- कोण सहभागी झाले होते, याचाही तपास करायचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अमली पदार्थांसह पार्टी केल्याप्रकरणातील आरोपींची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सातही जणांना मंगळवारी दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांच्या न्यायालयात हजर केले होते. सरकार पक्षातर्फे बाजू मांडताना सरकारी वकील अमित यादव म्हणाले, पोलिसांनी आरोपींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले आहेत. (Latest Pune News)
शुक्रवारी झालेल्या पार्टीत राहुल नावाचा व्यक्ती पोलिस तपासातून निष्पन्न झाला असून, तो हुक्का तयार करण्यासाठी येत होता. या आरोपीबाबत व गुन्ह्याच्या एकूण तपासाबाबत आरोपींकडे चौकशी केली असता ते तपासात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे आरोपींनी हे अमली पदार्थ कुठून आणले यात आणखी कोणत्या आरोपींचा सहभाग आहे का, याचा तपास करायचा आहे, त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. यादव यांनी केली. तर, डॉ. खेवलकर यांच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे तर काही आरोपींच्या वतीने अॅड. सचिन झाल्टे पाटील, अॅड. अजिंक्य मिरगळ, अॅड. श्रीनाथ मते यांनी बाजू मांडली.
डॉ. प्रांजल खेवलकरसह पाच जणांच्या पोलिस कोठडी वाढ
या प्रकरणात, डॉ. प्रांजल खेवलकर (वय 41, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखिल पोपटाणी ( वय 35, रा. डीएसके सुंदरबन, माळवाडी), समीर फकीर महंमद सय्यद (वय 41, ऑर्किड सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), सचिन सोनाजी भोंबे (वय 42, डायमंड पार्क सोसायटी, वाघोली ) आणि श्रीपाद मोहन यादव (वय 27, रा. पंचतारा नगर, आकुर्डी) या पाच जणांच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. तर, ईशा देवज्योत सिंग (वय 22, रा. कुमार बिर्ला सोसायटी, औंध) आणि प्राची गोपाल शर्मा (वय 23, रा. गोदरेज ग्रीन सोसायटी, म्हाळुंगे) यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.
काळ्या कोटात रोहिणी खडसे यांची न्यायालयात हजेरी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे या डॉ. प्रांजल यांच्या पत्नी असल्याने त्याही मंगळवारी सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित होत्या. पेशाने वकील असल्याने त्या वकिलांचा पोशाख घालून या सुनावणीला हजर होत्या. सुनावणी झाल्यानंतर त्यांनी “हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य नाही. माझा न्यायालयावर विश्वास आहे, अशी भावना व्यक्त केली.
आरोपींना गोवण्यामागे राजकीय षड्यंत्र: बचाव पक्ष
राजकीय षड्यंत्र करत आरोपींना यात गोवण्यात आले आहे. या गुन्ह्यातील महिला आरोपींकडे अमली पदार्थ देण्यात आले व त्यांना घटनास्थळी पाठविण्यात आले. हे न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही, असा युक्तिवाद अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केली.