

खडकवासला: पानशेत-मोसे मुठा खोऱ्यात गुरुवारी (दि.२७) पावसाचे प्रमाण वाढले. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक वाढली आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता पानशेत धरणाच्या वांजळवाडी सांडव्यातून ९८० क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.
याशिवाय पानशेतमधून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यात ६०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. एवढे पाणी सोडूनही धरणांची पातळी शंभर टक्क्यांवर कायम आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत.
जोरदार पाऊस नसला तरी रिमझिम वाढल्याने सर्व धरणांतून विसर्ग सुरू आहे. खडकवासलातून मुठा नदीत ३ हजार ४२४ क्युसेकने, तर पानशेत, टेमघरमधून २५० व वरसगावमधून २ हजार ८८ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. या तिन्ही धरणांतील पाण्याची भर पडत असल्याने जादा पाणी सोडूनही खडकवासला तुडुंब भरले आहे.
गुरुवारी दिवसभरात वरसगावमध्ये ६, पानशेतमध्ये ८, टेमघरमध्ये ३ व खडकवासलामध्ये १ मिलीमीटर पाऊस पडला. बुधवारपेक्षा गुरुवारी पावसाचे प्रमाण वाढले आहे. उघडिपीनंतर हलक्या सरी पडत आहेत.