

सासवड: पुरंदर तालुक्यातील पांगरे येथे गुरुवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ४७ वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. उज्वला रामदास काकडे (वय ४७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या महिलेवर भररस्त्यात हल्ला झाल्याने पांगरे गावासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उज्वला काकडे या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. बसस्थानकाच्या दिशेने जात असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोराने त्यांच्या डोक्यावर गंभीर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पांगरे गावचे पोलीस पाटील तानाजी काकडे यांनी तत्काळ सासवड पोलिसांना कळविले. त्यानंतर सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सासवड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
दरम्यान, भरवस्तीत आणि सकाळच्या वेळी महिलेची हत्या झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? हत्येमागे वैयक्तिक वाद, कौटुंबिक कारण की अन्य काही कारण आहे? हल्लेखोराने महिलेवर हल्ला करून घटनास्थळावरून पलायन केले का? अशा विविध शक्यता तपासल्या जात आहेत.
हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपीची ओळख पटविणे आणि त्याला ताब्यात घेणे हे सासवड पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.
भरसकाळी घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे पांगरे परिसरातील महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी आरोपीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे.