Cauliflower Price Crash: फ्लॉवरला ३ रुपये किलो भाव; कोबीचे पीक नांगरून टाकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

बेट भागात दीड महिन्यापासून दरात सुधारणा नाही; उत्पादन खर्चही निघेना, जनावरेही कोबी खाईनात, शेतकरी आर्थिक संकटात
Cauliflower
CauliflowerPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरखेड: दीड महिन्याचा कालावधी उलटूनही कोबी व फ्लॉवरच्या दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने आगामी काळात कोबी व फ्लॉवरलाही चांगला दर मिळेल, अशी बेट भागातील शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, बाजारातील मोठ्या आवकमुळे या पिकांना सातत्याने कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

Cauliflower
Baramati Courier Fraud: बारामतीत कुरिअर कंपनीत ४.७१ लाखांचा अपहार; डिलिव्हरी टीम लीडरविरोधात गुन्हा दाखल

बहुतांश भागांत कोबी व फ्लॉवरचे उत्पादन चांगले झाले. लागवड क्षेत्रातही मोठी वाढ झाल्याने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात माल बाजारात दाखल झाला. अतिरिक्त आवकेमुळे बाजारभावात मोठी घसरण झाली. फ्लॉवरच्या दरात अधूनमधून चढ-उतार झाल्याने काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतरही दरात अपेक्षित वाढ झाली नाही. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा भाव अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोबीच्या काढणीसाठी मजुरी, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत माल पोहोचविण्याचा खर्च वाढला आहे. मात्र, मिळणाऱ्या दरातून हा खर्चही भरून निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी कोबीच्या उभ्या पिकात नांगर फिरवून ते नष्ट केले आहे.

Cauliflower
Indapur Tehsil Office Protest: इंदापूर तहसील कार्यालयाविरोधात २५ नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा; तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी

जनावरेही कोबी खाईनात

बाजारात कोबीला अपेक्षित दर मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतातील पिकांमध्ये शेळ्या, मेंढ्या व जनावरे सोडली. मात्र, दररोज कोबी व फ्लॉवर खायला मिळत असल्याने जनावरेही त्याकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे अखेर पिकांचे अवशेष नष्ट करण्यासाठी रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

उत्पादन खर्च वाढला, उत्पन्न घटले

वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या रोग-किडींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोबी व फ्लॉवर पिकांवर मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. तसेच खतांची मात्रा आणि हंगामानुसार रोपांची लागवड करावी लागते. त्यामुळे या पिकांसाठी मोठा भांडवली खर्च करावा लागतो. एवढा खर्च करूनही उभ्या पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले आहेत.

Cauliflower
WhatsApp Wedding Invitation Scam: व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान! एका क्लिकने बँक खाते होऊ शकते रिकामे

फ्लॉवरचे दर कोसळले; शेतकरी अडचणीत

आंबेगाव तालुक्याच्या उत्तर व पूर्व भागासह मंचर परिसरात भाजीपाल्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. मंचर बाजार समितीत फ्लॉवरला फक्त ३ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्यामळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील महाळुंगे पडवळ, साकोरे, नांदूर, चास, विठ्ठलवाडी, फुलेवाडी, कळंब परिसरातील अनेक शेतकरी भाजीपाला उत्पादनावर अवलंबून आहेत. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून शेतकरी टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगी, कोथिंबीर, मेथी बिट व अन्य पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत. मात्र, बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली की दरात मोठी घसरण होत असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होत आहे.

भाजीपाला पिकविण्यासाठी रोपांची खरेदी, मशागत, खते, कीटकनाशके, औषध फवारणी, ठिबक सिंचन, पाणी देण्यासाठी लागणारी वीज, काढणी आणि वाहतूक यावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्यात मजुरांची टंचाई आणि वाढलेली मजुरी यामुळे उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने तो जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. बाजारात भाव कमी मिळाला तरी माल विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहत नाही. वाहतूक खर्च आणि बाजारातील इतर खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरी अत्यल्प रक्कम पडत आहे.

Cauliflower
Pune Water Shortage: पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; धरणांतील पाणीसाठा वर्षभरात ६ टीएमसीने घटला

काही वेळा माल विक्रीतून मिळणारी रक्कम काढणी व वाहतुकीच्या खर्चालाही पुरेशी ठरत नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे काही शेतकरी पाच हजार रुपये प्रतिएकर दराने फ्लॉवरचे पीक मेंढ्यांना चरण्यासाठी देत आहेत. पुणे, मुंबईच्या ग्राहकांना बाजारात भाजीपाला महाग दराने खरेदी करावा लागत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना मात्र कवडीमोल दराने माल विकावा लागत आहे. शेतातून बाजारपेठेपर्यंत येणाऱ्या प्रक्रियेत शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दरातील तफावत नेमकी का निर्माण होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, बाजार समित्यांमधील व्यवहार अधिक पारदर्शक करावेत, शीतग्रह उभारावीत, भाजीपाला संकलन केंद्र उभारावे, अशा मागण्या पुढे येत आहेत.

कष्ट शेतकऱ्यांचे, नफा कोणाचा?

दिवसरात्र शेतात राबून, पाण्याचे नियोजन करून आणि कर्ज काढून भाजीपाला पिकवायचा; मात्र बाजारात गेल्यानंतर अपेक्षित भाव मिळत नसेल तर शेती करायची तरी कशी, असा संतप्त सवाल आंबेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब इंदोरे यांनी उपस्थित केला आहे. तर उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस पक्षाचे सचिव ॲड. संजय बेंडे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.