पुणे; पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळ्यासाठी महापालिकेकडून केल्या जाणार्या तयारीला वेग आला आहे. पालखी मार्गावरील स्वच्छतेसोबतच पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 12 जून रोजी पुण्यात येत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आगमन आळंदी रस्त्यावरील कळस क्षेत्रीय कार्यालय सकाळी 11.30 वाजता होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखीचे मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडी सिग्नल चौक येथे दुपारी 1 वाजता आगमन होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार दोन्ही पालखींचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत.
शहरामध्ये दोन दिवस पालख्यांचा मुक्काम असल्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार पहिल्या दिवशी 1 हजार 290 फिरती शौचालये आणि दुसर्या दिवशी 1 हजार 290 फिरती शौचालये आणि तिसर्या दिवशी 513 फिरती शौचालये असे एकूण 3 हजार 093 फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अन्य ठिकाणी जेटिंग मशीनद्वारे सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
वारकरी मुक्कामास असलेल्या शाळांमध्ये महिला वारकर्यांसाठी स्नानगृहाची सोय आणि सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशीन्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी स्वतंत्र महिला कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत स्त्री-रोगतज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पालखी मार्गावर सार्वजनिक रस्त्यांची स्वच्छता केली जाते. रस्त्यावर मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री फिरणार नाहीत यासाठी कोंडवाडा विभाग व आरोग्य विभागामार्फत योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
पालखी मार्गावर पाण्याचे टँकर उभे करण्यात येणार आहेत. तसेच पाण्यासाठी स्टॅन्ड पोस्टदेखील उभे करण्यात येत आहे. पालिकेच्या वास्तूंमध्ये वारकर्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथेदेखील कायमस्वरूपी टँकर उभे करण्यात येणार आहेत. शहरांमध्ये पालखी आगमनाच्या दिवसापासून ते प्रस्थानापर्यंत या भागातील पाणीपुरवठा सुरळीत राखण्याची व्यवस्था पाणीपुरवठा विभागाने केली आहे.
महापालिकेने पालखीसाठी पुरवण्यात येणार्या मोफत सुविधा 21 दवाखान्यांमार्फत पुरवल्या जाणार आहेत. ज्ञानेश्वर महाराज पालखीबरोबर 90 वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. श्री संत तुकाराम महाराज पालखीबरोबर 86 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. पालखी सोहळ्याच्या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये केस पेपरशिवाय मोफत उपचार केले जाणार आहे.
पालखी मार्गावरील राडाराडा उचलण्यात आलेला असून, साफसफाई करण्यात आलेली आहे. पालखी मार्गावरील सिमेंट काँक्रीटचा भाग सोडून उर्वरित ठिकाणांच्या पॅच वर्कची कामे करण्यात आलेली आहेत.
पालख्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी आगप्रतिबंधक दृष्टीने अग्निशामक दलांकडून पाहणी करण्यात आली आहे. पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर सर्व शाळांची स्वच्छता करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना अग्निशमन दलाकडून आवश्यकतेनुसार पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पालख्यांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात असतील.
हेही वाचा